जुहू मधील “त्या” बंगल्यातून आज नारायण राणेंची तोफ धडाडणार !
राणेंची आज पत्रकार परिषद ; महापालिकेने बजावलेल्या नोटीसीचा राणे समाचार घेणार ?
कुणाल मांजरेकर
मुंबई : मुंबई महानगरपालिकेने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना नोटीस बजावत जुहू येथील ‘अधिश’ या बंगल्याची अंतर्गत तपासणी केली आहे. महापालिकेने ही कारवाई राजकिय सूडबुद्धीने केल्याचा आरोप भाजप कडून होत असतानाच नारायण राणे यांनी याच बंगल्यावर आज सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद ठेवली आहे. महापालिकेने केलेली कारवाई तसेच शुक्रवारी राणेंनी सुशांतसिंग, दिशा सालीयन मृत्यू आणि “मातोश्री” बाबत केलेलं ट्विट यामुळे ही पत्रकार परिषद गाजण्याची चिन्हे आहेत.
मुंबई महापालिकेने शुक्रवारी नारायण राणे यांच्या घराला नोटीस काढून आतील बांधकामाची तपासणी केली. या बंगल्याच्या आतील काही बांधकाम विनापरवाना करण्यात आले आहे का? याची पहाणी करण्यात आली आहे.
या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी शुक्रवारी एक ट्विट करीत अभिनेता सुशांतसिंग आणि दिशा सालीयन यांची हत्या झाल्याचा आरोप केला होता. तसंच ठाकरे कुटुंबातील चार जणांना ईडीची नोटीस येण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त करीत एकच खळबळ उडवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांची शनिवारी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद होत आहे. त्यामुळे नारायण राणे नेमकं काय बोलणार ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.