गोव्याला टक्कर देणार महाराष्ट्र! सिंधुदुर्गात जहाजबांधणी उद्योगाची ‘ब्ल्यू क्रांती’

मंत्री नितेश राणेंची उत्तर गोव्यातील शिपयार्डला भेट; जहाजबांधणी, डाय डॉक आणि रोजगारनिर्मितीच्या संधींची पाहणी

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्याला केवळ पर्यटनापुरते मर्यादित न ठेवता जहाजबांधणी आणि जहाज दुरुस्ती उद्योगाचे मोठे केंद्र बनविण्याच्या दिशेने हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी गुरुवारी उत्तर गोव्यातील प्रका इंजिनिअरिंग शिपयार्डला भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली. जहाजबांधणी, डाय डॉक, जहाज दुरुस्ती आणि या क्षेत्रातील रोजगारनिर्मितीची क्षमता याचा त्यांनी यावेळी आढावा घेतला.

प्रका इंजिनिअरिंग शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक प्रियेश कामत यांनी शिपयार्डमधील प्रत्यक्ष कामकाजाचे सादरीकरण केले. परदेशातून आलेल्या जहाजांची दुरुस्ती, डाय डॉकची सुविधा, जहाजबांधणीची प्रक्रिया तसेच या उद्योगाशी निगडित विविध व्यवसाय आणि रोजगाराच्या संधींची माहिती यावेळी देण्यात आली.

“महाराष्ट्र आणि विशेषतः सिंधुदुर्गमध्ये जहाजबांधणी उद्योग रोजगाराची मोठी क्रांती घडवू शकतो. महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न वाढविणारा हा महत्त्वाचा स्रोत ठरू शकतो. गोव्यापेक्षाही या उद्योगासाठी महाराष्ट्राकडे मोठी क्षमता आणि संधी आहे,” असा ठाम दावा प्रियेश कामत यांनी केला.

सिंधुदुर्गच्या समुद्रकिनाऱ्याला उद्योगाची जोड मिळणार?

सिंधुदुर्गाकडे विस्तीर्ण समुद्रकिनारा, बंदरे आणि जलवाहतुकीची क्षमता असताना जहाजबांधणी व दुरुस्ती उद्योगाच्या माध्यमातून या भौगोलिक ताकदीचे आर्थिक सामर्थ्यात रूपांतर करण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे. हा उद्योग प्रत्यक्षात आला तर केवळ जहाजबांधणीपुरते रोजगार मर्यादित राहणार नाहीत. वेल्डिंग, फॅब्रिकेशन, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, मरीन इंजिनिअरिंग, लॉजिस्टिक्स, स्पेअर पार्ट्स, तांत्रिक सेवा आणि पूरक व्यवसायांना मोठी चालना मिळू शकते.

स्थानिक तरुणांसाठी रोजगाराचे नवे दालन!

सिंधुदुर्गातील युवकांना आवश्यक तांत्रिक प्रशिक्षण देऊन या उद्योगाशी जोडले तर नोकरीसाठी मुंबई-पुणे किंवा गोवा गाठण्याची वेळ कमी होऊन रोजगाराची संधी जिल्ह्यातच उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे किनारपट्टीवरील अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळण्याबरोबरच स्थानिक उद्योगांनाही मोठी बाजारपेठ मिळण्याची शक्यता आहे. मंत्री नितेश राणे यांच्या या पाहणीमुळे सिंधुदुर्गात जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि मरीन इंजिनिअरिंग क्षेत्राच्या भविष्यातील शक्यतांबाबत चर्चेला वेग आला आहे. गोव्याने उभारलेल्या शिपयार्ड मॉडेलचा अभ्यास करून महाराष्ट्रात त्यापेक्षा मोठी क्षमता निर्माण करण्याच्या दृष्टीने ही भेट महत्त्वाची ठरू शकते.

‘पर्यटन जिल्हा’ ते ‘मरीन इंडस्ट्री हब’?

सिंधुदुर्गची ओळख पर्यटनाबरोबरच जहाजबांधणी, जहाज दुरुस्ती आणि सागरी उद्योगांचे केंद्र म्हणून निर्माण करण्याची क्षमता या जिल्ह्यात आहे. आता या क्षमतेला प्रत्यक्ष उद्योगाचे रूप मिळणार का, याकडे सिंधुदुर्गातील युवक, उद्योजक आणि किनारपट्टीवरील व्यावसायिकांचे लक्ष लागले आहे.

यावेळी प्रका इंजिनिअरिंग शिपयार्डचे व्यवस्थापकीय संचालक प्रियेश कामत, प्रशांत देसाई, उद्योजक डॉ. निलेश बाणावलीकर, सूरज देव्हाद्या, बाबू नाईक आणि साईल देसाई उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद सदस्य मनोज रावराणे, मिलिंद मेस्त्री, संदीप साटम, रुपेश कानडे, डॉ. अमोल तेली यांच्यासह सिंधुदुर्गातील लोकप्रतिनिधींनी या दौऱ्यात सहभाग घेत शिपयार्डमधील प्रकल्पाची पाहणी केली.

error: Content is protected !!