सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय, रक्तकेंद्र व रक्त विघटन केंद्रातील रक्ताचा आणि रक्तपिंडांचा (Platelets) तुटवडा लक्षात घेत ‘सेवास्पर्श फाऊंडेशन’ने सामाजिक बांधिलकी जपत तातडीने रक्तदान मोहीम राबवली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या अधिकृत आवाहनाला प्रतिसाद देत फाऊंडेशनच्या माध्यमातून गुरुवारी तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात जाऊन उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. यावेळी १६ जणांनी रक्तदानाचा हक्क बजावला.

जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथील रक्तपेढीत सध्या रक्ताचा साठा कमी झाला असून, वाढती मागणी आणि अपुरा पुरवठा यामुळे रुग्णांसाठी ऐनवेळी रक्ताची टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाच्या रक्त संक्रमण अधिकाऱ्यांनी ‘सेवास्पर्श फाऊंडेशन’चे अध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर यांना पत्र लिहून रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आणि परिचयातील सामाजिक कार्यकर्त्यांना स्वेच्छेने रक्तदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे नम्र आवाहन केले होते. पत्राची गांभीर्याने दखल घेत, सेवास्पर्श फाऊंडेशनने आज रक्तदान मोहीम हाती घेतली.
यावेळी सेवास्पर्श फाऊंडेशनचे सदस्य ॲड. प्रदीप मिठबावकर, गणेश वाईरकर, शेखर मसुरकर, सागर चव्हाण, बाळकृष्ण वालावलकर, महेश चव्हाण, गुरुप्रसाद राऊळ, विनय मठकर, किरण वाईरकर, दिपक राऊळ, उमेश पाटील, बीजी गावडे, स्वप्निल वेंगुर्लेकर, अभिषेक नेवाळकर, साईराज पावसकर यांनी जिल्हा रुग्णालयाच्या रक्त केंद्रात प्रत्यक्ष उपस्थित राहून उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. फाऊंडेशनच्या या तातडीच्या पुढाकारामुळे जिल्हा रुग्णालयातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास मोठी मदत होणार आहे.
जिल्ह्यातील रुग्णांना वेळेत रक्त मिळावे आणि रक्ताभावी कोणाचाही जीव धोक्यात येऊ नये, यासाठी आमच्या फाऊंडेशनने नेहमीच पुढाकार घेतला आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज आमच्या सहकाऱ्यांनी रक्तदान केले असून, आगामी काळातही अशा उपक्रमांना आमचे प्राधान्य राहील, अशी प्रतिक्रिया सेवास्पर्श फाउंडेशनचे अध्यक्ष परमानंद वेंगुर्लेकर यांनी व्यक्त केली आहे. या कौतुकास्पद सामाजिक कार्याबद्दल जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी आणि सिंधुदुर्गवासीयांकडून सेवास्पर्श फाऊंडेशनचे विशेष आभार मानले जात आहेत. तसेच जिल्ह्यातील इतर तरुण आणि सामाजिक संस्थांनीही या काळात पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.







Subscribe to my channel





