मच्छीमार बांधव आमदार निलेश राणे यांच्या भेटीला ; मत्स्य व्यवसायासाठी पुरवठा होणाऱ्या डिझेल प्रतिपूर्ती दरवाढीबाबत निवेदन

मत्स्यव्यवसायातील विविध विषयावर चर्चा : आ. निलेश राणे यांनी प्रशासनाशी चर्चा करून काही प्रश्नांची केली तात्काळ सोडवणूक

मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांनी मालवण येथे आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन आपल्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. मत्स्यव्यवसायासाठी पुरवठा होणाऱ्या डिझेल प्रतिपूर्ती दरवाढीबाबत सिंधुदुर्ग जिल्हा मच्छीमार सहकारी संस्था फेडरेशनमार्फत आमदार निलेश राणे यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, आपण शासन स्तरावर पाठपुरावा करत असून मंत्री नितेश राणे यांनी केंद्र शासनालाही याबाबत पत्र पाठवले आहे. मच्छीमारांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.

मच्छिमारांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, मच्छीमार सहकारी संस्थांना दिल्या जाणाऱ्या डिझेलचे “बल्क सेल” वर्गीकरण तात्काळ रद्द करून ते रिटेल अथवा सवलतीच्या दरात समाविष्ट करण्यात यावे. मत्स्य व्यवसायासाठी पुरवठा होणारा डिझेल प्रतिपूर्ती दर वाढवून मिळावा. त्यासोबत डिझेल परतावा/प्रतिपूर्ती दर त्रैमासिक नियमितपणे वितरित करण्यात यावा. “बल्क सेल” वर्गीकरणामुळे निर्माण झालेल्या अडथळ्यांमुळे मच्छीमारांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे अधोरेखित करण्यात आले.

मालवणात सुसज्ज जेटी व्हावी

मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेत मच्छीमारांच्या दृष्टीने अधिक योजना समाविष्ट कराव्यात. मालवण येथे सुसज्ज जेटीची उभारणी व्हावी. यासह अन्य मागण्या करण्यात आल्या. याबाबतही माझे व मंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न सुरू असून लवकरच जेटी उभारणीचा शुभारंभ होईल. आम्ही मच्छीमारांच्या सोबत ठामपणे असल्याचे आमदार निलेश राणे यांनी मच्छीमारांना आश्वस्त केले.

जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा

सद्यस्थितीत कॅन अथवा बॅरल मधून डिझेल, पेट्रोल वितरण पेट्रोल पंपावर केले जात नाही. याचा फटका मच्छीमार बांधवांना बसत आहे. याबाबतही मच्छीमारांनी आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधले. याबाबत जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांच्याशी तात्काळ संपर्क साधून संबंधित प्रश्नांवर लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या सूचना आमदार निलेश राणे यांनी दिल्या. याबाबत मच्छिमार बांधवानी समाधान व्यक्त केले.

error: Content is protected !!