मंत्री नितेश राणेंच्या निर्देशानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सागरी हद्दीत परप्रांतीय नौकांवर कारवाई सुरूच…

चालू मासेमारी हंगामातील परप्रांतीय नौकेवरील ६ वी मोठी कारवाई : पाठलाग करत १४ वावात मलपी येथील ट्रॉलर पकडला

देवगड : महाराष्ट्राच्या सागरी मत्स्यव्यवसाय क्षेत्राचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या सक्त निर्देशानुसार मत्स्यव्यवसाय विभाग सजग राहून कार्यरत आहे. परप्रांतीय नौकांद्वारे होणाऱ्या बेकायदा मासेमारीला आळा घालण्यासाठी विभाग कठोर पावले उचलत आहे. याच धोरणाचा भाग म्हणून शनिवारी पहाटे महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत ट्रॉलिंगद्वारे अनधिकृत मासेमारी करणाऱ्या कर्नाटक राज्यातील मलपी येथील मासेमारी नौकेवर धडक कारवाई करण्यात आली.

शनिवारी २० डिसेंबर रोजी पहाटे सुमारे ४:३० वाजता देवगड समोर सागरी हद्दीत अंदाजे १४ वावात ही नौका मासेमारी करताना आढळली. गस्ती पथकाच्या नौकेजवळ पोहोचताच सदर नौकेने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पथकाने तिचा पाठलाग करून यशस्वीपणे नौका ताब्यात घेतली. महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम १९८१ तथा सुधारित अधिनियम २०२१ च्या तरतुदींनुसार ही बेकायदा मासेमारी सिद्ध झाल्याने नौका जप्त करण्यात आली.

सदर नौका महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत कोणताही वैध परवाना न घेता ट्रॉलिंग पद्धतीने मासेमारी करताना आढळली. नौकेवर तांडेलसह एकूण ७ खलाशी उपस्थित होते. नौका ताब्यात घेऊन ती देवगड बंदरात सुरक्षित आणण्यात आली आहे. नौकेवर सापडलेल्या मासळीचा लिलाव प्रक्रिया सुरू असून, प्रकरणाचा सविस्तर अहवाल सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग यांचे कडे प्रतिवेदन दाखल केला जाईल. सुनावणीनंतर नौकामालक व संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

ही यशस्वी कारवाई श्री. किरण वाघमारे, अंमलबजावणी अधिकारी तथा सहाय्यक मत्स्य विकास अधिकारी (परवाना अधिकारी, देवगड) यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पार पाडली. त्यांना सागरी सुरक्षा पर्यवेक्षक व रक्षक श्री. टुकरुल, श्री. खवले, श्री. फाटक, श्री. बांधकर, श्री. नेसवंकर, श्री. सावजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ही कारवाई सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, सिंधुदुर्ग सागर कुवेसकर यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्णत्वास नेली गेली. या मासेमारी हंगामातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील परप्रांतीय नौकेवरील ६ वी मोठी कार्यवाही आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या या सततच्या कठोर प्रयत्नांमुळे स्थानिक मच्छीमारांचे हित सुरक्षित राहत असून, सागरी जैवविविधतेचे संरक्षणही प्रभावीपणे होत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय विभागाचे मंत्री नितेश राणे यांच्या दिशानिर्देशनात विभागाचे अधिकारी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करत आहेत.

error: Content is protected !!