कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत उबाठाला मोठा धक्का : बाळ मानेंचा अर्ज मागे

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे किंगमेकर : निवडणुकीतील घोडेबाजार टाळण्यासाठी निर्णय : बाळ मानेंचे स्पष्टीकरण

रत्नागिरी : कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघाच्या निवडणुकीत आज नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. या मतदार संघातील शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार माजी आमदार बाळ माने यांनी अखेरच्या क्षणी आपला अर्ज मागे घेतला असून ठाकरे गटाला हा फार मोठा धक्का बसला आहे. अर्ज मागे घेण्याच्या दिवशी भाजपचे युवा नेते राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थिती होती. त्यामुळे पडद्या मागच्या घडामोडीचे किंगमेकर नितेश राणे हेच असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. बाळ माने यांनी रिंगणातून माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महाविकास आघाडीकडे निवडून येण्यासाठी योग्य ते संख्याबळ नसल्याने आपण निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असल्याचे माजी आमदार बाळ माने यांनी सांगितले. आपणाला निवडणूक अर्ज भरताना सूचक उपलब्ध होत नव्हते. त्यामुळेच निवडणुकीतील घोडेबाजार रोखण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे देखील त्यांनी मान्य केले. भाजपचेष्ठ नेते नारायण राणे यांच्याशी आजही आपले सलोख्याचे संबंध असल्याचे स्पष्ट करताना कोकणच्या राजकारणातील राणे कुटुंबाचे वर्चस्व बाळ माने यांनी अप्रत्यक्षरीत्या अधोरेखित केले आहे. तर मंत्री नितेश राणे यांनी आपण केवळ महायुतीचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिल्याचे म्हटले आहे.

error: Content is protected !!