
मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सहायक आयुक्तांची ऑनलाइन बैठक; तलाव, जलाशयांची पाहणी करून पंचनाम्याची पूर्वतयारी करण्याच्या सूचना
सिंधुदुर्ग : राज्यातील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा फटका मत्स्यव्यवसायालाही बसण्याची शक्यता लक्षात घेऊन, संभाव्य नुकसानग्रस्त मच्छिमारांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले. मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यक्षेत्रातील तलाव, जलाशय आणि मत्स्यशेतीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून आवश्यक असल्यास पंचनामे करण्यासाठी पूर्वतयारी पूर्ण ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयातून राज्यातील सर्व सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांची ऑनलाइन बैठक घेण्यात आली. मंत्रालय, मुंबई येथून मत्स्य आयुक्त भानुदास पालवे तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय ऑनलाइन उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व विभागांना दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार मत्स्यव्यवसाय विभागाने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व तलाव, जलाशय आणि मत्स्यशेतीच्या ठिकाणांची प्रत्यक्ष पाहणी करून वस्तुनिष्ठ माहिती संकलित करावी, असे मंत्री राणे यांनी सांगितले. प्रत्येक जिल्ह्यातील सहायक आयुक्तांनी संबंधित तलाव व जलाशयांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाणीसाठ्याची सद्यस्थिती तपासावी. स्थानिक मच्छिमारांशी संवाद साधून दुष्काळसदृश्य परिस्थितीचा त्यांच्या व्यवसायावर होणारा परिणाम जाणून घ्यावा. जिल्हानिहाय एकूण तलावांची संख्या, उपलब्ध पाणीसाठा, संभाव्य बाधित तलाव आणि बाधित होण्याची शक्यता असलेल्या तालुक्यांची माहिती तातडीने संकलित करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
मत्स्यशेतीला कृषीचा दर्जा मिळाल्याने शेतीच्या नुकसानीसोबतच मत्स्यव्यवसाय करणाऱ्या बाधित मच्छिमारांचाही मदतीसाठी विचार होणे आवश्यक आहे, असे मंत्री राणे यांनी स्पष्ट केले. त्यासाठी जिल्ह्यातील संभाव्य बाधित मच्छिमारांची माहिती संकलित करून ती जिल्हा प्रशासनाकडे सादर करावी, असे त्यांनी सांगितले. माहिती संकलन आणि प्रत्यक्ष पाहणी करताना मच्छिमारांशी संवेदनशीलतेने संवाद साधावा. शासनाकडून आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याची माहिती देऊन त्यांना दिलासा द्यावा, अशा सूचनाही मंत्री राणे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
दुष्काळसदृश्य परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी आपण स्वतः विविध भागांचा दौरा करणार असून, बाधित मच्छिमारांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही मंत्री राणे यांनी दिली. बैठकीदरम्यान मंत्री राणे यांनी जिल्हानिहाय मत्स्यव्यवसायाशी संबंधित तलावांची संख्या, उपलब्ध पाणीसाठा, संभाव्य बाधित तलाव आणि बाधित होण्याची शक्यता असलेल्या तालुक्यांचा आढावा घेतला. परिस्थितीची तीव्रता लक्षात घेऊन प्रशासनाने आवश्यक ती पूर्वतयारी आणि माहिती संकलनाची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश त्यांनी दिले.






Subscribe to my channel






