ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी नोंद करा ; भाजप प्रदेश सचिव निलेश राणेंनी वेधले लक्ष
शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास आंदोलनाचा इशारा
मालवण : शासनाने चालू वर्षी ई-पीक पाहणी नोंद अनिवार्य केली असून याची अंमलबजावणी आपल्या जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यापासून करण्यात आलेली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विचार करता जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये आजही नेटवर्क सुविधा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत ई-पीक पाहणी ऍप द्वारे पिकाची नोंदी घेणे शेतक-यांना शक्य होणार नाही. नोंद करण्यास ३० सप्टेंबर ही शेवटची तारीख दिली आहे. नोंद न केल्यास त्यानंतर अनेक शेतकरी अडचणीत येणार आहेत. शेतक-यांच्या पीक पाहणी मध्ये अडचणी निर्माण झाल्यास भारतीय जनता पार्टी सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल. आणि त्यातून उद्रेक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असा इशारा माजी खासदार निलेश राणे यांनी दिला आहे.
शासनाने ३० सप्टेंबर पर्यंत ई-पीक नोंद करण्यास मुदत दिली असून या मुदती अखेर पर्यंत पीक पाहणी नोंद न झाल्यास अनेक समस्या शेतक-यांसमोर उत्पन्न होणार आहेत. उदा. आंबा, काजु, शेती पिकाची नोंद न झाल्यास पिक कर्ज, पिक विमा, जमिन विक्री व्यवहार करताना समस्या निर्माण होणार आहेत. शासनाने पिक पाहणी साठी कृषी सहाय्यकांना पीक पाहणी करण्यासाठी सांगितले असून रितसर आदेश नसल्याने कृषी सहाय्यक या प्रक्रियेमध्ये अद्याप सक्रिय झालेले नाहित. अशा परिस्थितीत जर पीक पाहणी रितसर झाली नाही तर शेतकऱ्यांची पीक पाहणी निरंक दिसणार आहे. यासाठी शासनाने ऑफलाईन पद्धतीने पीक पाहणी नोंद करुन घेण्यात यावी अशी मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने करत आहोत.
शेतक-यांच्या पीक पाहणी मध्ये अडचणी निर्माण झाल्यास भारतीय जनता पार्टी सर्व सामान्य शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरेल. आणि त्यातून उद्रेक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.