मालवणमध्ये अनधिकृत वाळू वाहतुकीला दणका

महसूल-पोलिसांची धडक; तीन डंपर जप्त : प्रत्येक डंपरला १.२५ लाखांपर्यंत दंडाची शक्यता

मालवण : मालवणमध्ये रात्रीच्या अंधारात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर महसूल आणि पोलीस प्रशासनाने जोरदार प्रहार केला. देऊळवाडा नाका येथे मंगळवारी रात्री उशिरा संयुक्त कारवाई करत वाळू वाहतूक करणारे तीन डंपर जप्त करण्यात आले. या कारवाईने अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत जप्त केलेल्या प्रत्येक डंपरमध्ये दोन ब्रास वाळू आढळली. तिन्ही डंपर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले असून, प्रत्येक वाहनावर १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई होण्याची शक्यता आहे. संबंधित वाहनचालकांना नोटीस बजावून त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे.

कारवाईचा बडगा उगारला; आता लिलाव कधी?

महसूल आणि पोलीस प्रशासनाने अवैध वाळू वाहतुकीविरोधात कठोर भूमिका घेतली असली, तरी गेल्या दोन वर्षांपासून अधिकृत वाळू लिलाव न झाल्याचा मुद्दा गंभीर बनला आहे. शासनाकडून लिलाव प्रक्रिया सुरू करण्याबाबत वारंवार आश्वासने दिली जात असल्याचा दावा व्यावसायिकांकडून केला जात आहे; मात्र प्रत्यक्ष प्रक्रिया मार्गी लागत नसल्याने डंपर व्यावसायिक आणि कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

एका बाजूला अवैध वाहतुकीवर कारवाईचा बडगा, तर दुसऱ्या बाजूला अधिकृत वाळू उपलब्धतेबाबत अनिश्चितता, अशी स्थिती मालवणमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे केवळ कारवाई करून प्रश्न सुटणार की अधिकृत वाळू लिलावाचा मार्गही मोकळा होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

दरम्यान, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. आता अवैध वाहतुकीला आळा घालतानाच अधिकृत वाळू लिलावाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासन काय पावले उचलते, याकडे मालवणकरांचे लक्ष लागले आहे.

error: Content is protected !!