
जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त सिंधुदुर्ग कॉलेजमध्ये जनजागृती; सौ. मेघना जोशी यांचे मार्गदर्शन : लायन्स क्लब मालवणचा सामाजिक उपक्रम
मालवण : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त लायन्स क्लब मालवणच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्य, ताणतणाव आणि आत्महत्या प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय संलग्न रामभाऊ परुळेकर कनिष्ठ महाविद्यालय, मालवण येथे हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.
यावेळी मनोपचार तज्ज्ञ, सल्लागार तथा ज्येष्ठ मार्गदर्शक सौ. मेघना जोशी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत मानसिक ताणतणावाच्या काळात भावनिक आधार, संवाद आणि योग्य वेळी मदत घेण्याचे महत्त्व स्पष्ट केले.
“मनातल्या भावना दडपून ठेवण्यापेक्षा त्या व्यक्त करणे महत्त्वाचे आहे. अडचणीच्या काळात विश्वासू व्यक्तीशी संवाद साधा आणि गरज भासल्यास समुपदेशनाची मदत घ्या,” असे आवाहन सौ. मेघना जोशी यांनी केले. महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांना शैक्षणिक अपेक्षा, कौटुंबिक परिस्थिती, नातेसंबंध तसेच सामाजिक दबाव अशा विविध आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. अशा वेळी समस्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहणे, कुटुंबीय व मित्रांशी मोकळेपणाने संवाद साधणे आणि आवश्यकतेनुसार तज्ज्ञांची मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये मानसिक आरोग्याविषयी खुलेपणाने बोलण्याची संस्कृती, भावनिक अडचणी ओळखण्याची जाणीव आणि मदत घेण्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कार्यक्रमाला प्राचार्य के. के. राबते, लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, प्राध्यापक अन्वेषा कदम, हर्षदा धामापुरकर, स्नेहा बर्वे, प्रांजल परुळेकर, हसन खान, लायन्स क्लबच्या खजिनदार राधिका मोंडकर, उपाध्यक्ष मनाली दळवी यांच्यासह गणेश प्रभुलकर, महेश अंधारी, रुजरीओ पिंटो, मुकेश बावकर, राजा शंकरदास, विश्वास गावकर, उमेश शिरोडकर, गीता आचरेकर, रूपा कांदळगावकर आदी उपस्थित होते.
विद्यार्थी नक्षत्रा जावकर, जतीन करंगुटकर, साहिल बागवे, माहीन शेख यांच्यासह बहुसंख्य विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात सहभाग घेत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. मानसिक आरोग्य आणि आत्महत्या प्रतिबंधासारख्या संवेदनशील विषयावर विद्यार्थ्यांमध्ये संवाद व जनजागृती घडवून आणण्यासाठी लायन्स क्लब ऑफ मालवणने राबविलेल्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.






Subscribe to my channel






