१२० जणांचे सोने, ६ कोटींची फसवणूक; मालवणात चौघांवर गुन्हा

मुथूट फिनकॉर्पच्या शाखा व्यवस्थापकासह चौघांविरोधात कारवाई ; आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे तपास

मालवण : मालवण शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे सोने तारण ठेवून फसव्या स्कीममध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त करत तब्बल ६ कोटी ९ लाख ६१ हजार ५५५ रुपयांची फसवणूक केल्याच्या प्रकरणाने मालवणात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अखेर मालवण पोलिसांनी मुथूट फिनकॉर्पच्या मालवण शाखेच्या मॅनेजर स्नेहा जामसंडेकर, कर्मचारी तन्मय पराडकर, स्नेहल आचरेकर आणि एजंट हर्षदा आडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कोळंबच्या सरपंच सिया रामचंद्र धुरी यांच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमांनुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, जून २०२५ ते मे २०२६ या कालावधीत नागरिकांकडून सोने तारण ठेवून विविध स्कीमच्या माध्यमातून रक्कम जमा करण्यात आली. सुमारे १२० नागरिकांकडून सोन्याचे दागिने घेऊन त्याचा गैरवापर केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांच्या आदेशाने तपास जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून तपास सुरू आहे.दरम्यान, या कथित फसवणुकीतील पीडित महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी सामाजिक स्तरावर ‘सोने तारण फसवणूक तक्रार निवारण मंच’ स्थापन करण्यात आला आहे. या मंचाच्या माध्यमातून पीडित नागरिकांच्या तक्रारी एकत्रित करून त्यांना कायदेशीर मदत व न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

या प्रकरणातील एकूण फसवणुकीची व्याप्ती, सोन्याचे दागिने नेमके कुठे गेले, संबंधित व्यवहारांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि किती नागरिक या प्रकरणात बाधित झाले आहेत, याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून केला जात आहे.

error: Content is protected !!