आताच्या निवडणूकीत मेरिट पेक्षाही वेगवेगळ्या आमिषांकडे मतदारांचा कल ; पण….
जिल्हा बँक संचालक व्हिक्टर डान्टस यांचं रोखठोक मत ; स्वतःच्या विजयाचं सूत्र केलं स्पष्ट
कुणाल मांजरेकर
मालवण : सहकार क्षेत्रात काम करताना पूर्वीचे विजय फार कठीण नव्हते. त्यावेळचे विजय हे सहज मिळवलेले विजय होते. त्यासाठी मतदार आमचं सामाजिक कार्य आणि सहकारामधील अभ्यास याच्या आधारावर आम्हाला निवडून देत असत. पण अलीकडील निवडणुकीत मेरीट पेक्षाही वेगवेगळ्या आमिषांकडे मतदार आकर्षित होताना दिसत आहेत. परंतु, ही आमिषे मतदारांनी स्वीकारू नयेत. त्याचे दुष्परिणाम काय होतील, हे आपण योग्यवेळी मतदारांना पटवून दिले, शेतकऱ्यांचे हित कशात आहे, हे सांगण्या बरोबरच मतदारांना त्यांच्या जबाबदारीची योग्य प्रकारे जाणीव करून दिली, तर मतदार सुद्धा अशा आमिषांना बळी पडत नाहीत. हे आपल्या निवडणूकीतून दिसून आले, अशी प्रतिक्रिया जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डान्टस यांनी “कोकण मिरर” शी बोलताना व्यक्त केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व्हिक्टर डान्टस यांनी नुकत्याच झालेल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सलग चौथ्यांदा विजयश्री खेचून आणला आहे. यावेळच्या निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी जोरदार व्यूहरचना करण्यात आली होती. त्यातून डान्टस यांच्या पराभवाचे गणितच विरोधकांनी मांडले होते. मात्र व्हिक्टर डान्टस यांनी स्वतःचा सहकारातील अभ्यास आणि कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर पुन्हा एकदा जिल्हा बँकेतील विजय खेचून आणला आहे. त्यानंतर “कोकण मिरर” शी बोलताना त्यांनी आपल्या विजयाबाबत सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, सातत्याने आपण ज्या विकास संस्थेचे प्रतिनिधित्व करतो, तेथील लोकांची आपण नियमितपणे कामे करू शकलो, तेथील शेतकऱ्यांना आर्थिक पतपुरवठा करताना त्यांना येणाऱ्या अडचणी आपण योग्य वेळी सोडवल्या तर त्यांचा आपल्यावर विश्वास बसतो. प्रामाणिक पणाने कोणतेही काम केले तर यश हे नक्कीच येते, असं मानणार्या पैकी मी एक आहे. जिल्हा बँकेच्या तीन टर्म मध्ये सहकारी संस्थांमध्ये मी वावरत असल्याने आणि त्यांच्या अडीअडचणी त्या त्यावेळी सोडवत असल्याने या सहकारी संस्थांचा माझ्यावर विश्वास बसलेला आहे. त्या विश्वास आणि प्रामाणिकपणामुळेच आपण जिल्हा बँक निवडणुकीत यशस्वी होऊ शकलो, असं ते म्हणाले.
पूर्वीचे विजय आणि आताचे विजय यातील फरक
यावेळी व्हिक्टर डान्टस यांनी सहकार क्षेत्रातील पूर्वीचे विजय आणि आताचे विजय यावर परखडपणे भाष्य केले. यापूर्वी सहकार क्षेत्रात निवडून येताना सहकारामधील अभ्यास पाहूनच आम्हाला मतं दिली जायची. पण आताच्या निवडणुकीत मेरिट पेक्षा वेगवेगळ्या आमिषांकडे लोक आकर्षित होताना दिसतात. ही आमिषे त्यांनी स्वीकारू नयेत, त्याचे दुष्परिणाम काय होतील हे आपण योग्यवेळी मतदारांना पटवून दिले तर मतदार सुद्धा त्या आमिषांना बळी पडत नाही. तेही प्रयोग काही प्रमाणात या निवडणुकीत करण्यात आले. मतदारांचे मतपरिवर्तन करून शेतकऱ्यांचे हित जपले पाहिजे, यासाठी त्यांच्या जबाबदारीची त्यांना योग्य प्रकारे जाणीव करून दिली पाहिजे. निवडणुकीत मी त्याप्रकारे मतदाराना विश्वास देत राहिलो, त्यामुळेच या निवडणुकीत मतदार अशा कोणत्याही आमिषाला बळी पडले नाहीत. आदरणीय शिवरामभाऊ जाधव आणि ढोलम साहेबांच्या नेतृत्वाखाली आर्थिक शिस्त कशी असते, हे आम्ही शिकलो. अशा आर्थिक शिस्तीवर सहकारी संस्थांचे यश अवलंबून असते. शिवरामभाऊ आणि दोलम साहेब यांच्या सारख्या लोकांचे आमच्यावर संस्कार झाले, हे मी माझे भाग्य समजतो. त्यामुळे ही निवडणूक कितीही कठीण असली तरी त्यांनी शिकवलेल्या आदर्शामुळे आणि त्यांनी दिलेल्या मार्गदर्शनामुळे कठीण परिस्थितीतही मी ही निवडणूक जिंकू शकलो, असे व्हिक्टर डान्टस म्हणाले.
जिल्हा बँकेत कुठल्याही संस्थेची अथवा कर्जदाराची अडचण होणार नाही
जिल्हा बँकेमध्ये अनेक पक्षाची लोक येत असतात. आम्ही आतापर्यंत कोणत्याही अर्जदार, ठेवीदारांच्या कामात पक्षीय राजकारण आणले नाही. काम करायचं असेल तर ते अभ्यासपूर्वक केलं पाहिजे आणि व्यवस्थितरित्या त्याचं प्रेझेंटेशन केलं तर उद्या जिल्हा बँकेच्या सत्तेत कोणी आलं तरी आम्हाला रोखू शकणार नाही. कायद्यात बसणाऱ्या गोष्टीच आपण करायच्या असतात आणि त्या योग्य प्रकारे मी करत होतो. कोकणात कर्जदार हा कर्जाला घाबरतो. त्याला आपण योग्य प्रकारे सहकार्य केलं तर तो कर्ज घेतो आणि फेडतो सुद्धा ! त्याच्याकडून कर्ज वसूल करण्याची खुबी आम्हाला आणि आमच्या बँकेच्या कर्मचाऱ्यांना माहीत आहे. शिवरामभाऊंनी शेतकऱ्यांची मुलं या बँकेत नोकरीला लावली. ती आजही बँकेत येथील लोकांना प्रामाणिकपणे सेवा देत आहेत, आणि या प्रामाणिकपणा मुळेच जिल्हा बँक प्रगतीपथावर आहे. हा सगळा अभ्यास आमच्याकडे असल्याने कुठल्याही संस्थेची अथवा कर्जदाराची बँकेत अडचण होणार नाही, असे ते म्हणाले.
मतदारांचे ऋण या जन्मात फेडणे अशक्य
मागील सलग चार टर्म मला निवडून देणाऱ्या मतदारांचे ऋण या जन्मात फिटणार नाही. कुठल्याही आमिषाला माझे मतदार बळी पडले नाहीत त्यांचे मी आभार मानतो. प्रामाणिक माणसे बँकेत असली पाहिजेत, या बँकेत लोकांच्या कोट्यावधीचा ठेवी आहेत आणि बँकेच्या व्यवहारावर येथील शेतकरी फार मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. त्यामुळे चांगली माणसे बँकेत जाणे आवश्यक आहे. असा विचार करून कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही दहशतीच्या राजकारणाला बळी न पडता मतदारांनी आपले पवित्र मत प्रामाणिकपणाला दिले आहे. या मतदारांचे ऋण मी फेडू शकत नाही, असेही व्हिक्टर डान्टस यांनी शेवटी म्हटले आहे.