ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर संविधानाचा जागर!

‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; गडकिल्ले संवर्धनासह संविधानिक मूल्ये जपण्याचा सामूहिक संकल्प

मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यशाली स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर संविधान दिनानिमित्त संविधानाचा गौरव आणि पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला. ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ या विशेष उपक्रमांतर्गत किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम, भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. ऐतिहासिक वारशाचे जतन, पर्यावरणाचे संरक्षण आणि संविधानातील मूल्यांचे संवर्धन असा या उपक्रमातून त्रिवेणी संगम साधण्यात आला.

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट असलेल्या महाराष्ट्रातील अकरा किल्ल्यांच्या परिसरात एकाचवेळी हा उपक्रम राबविण्यात आला. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि पर्यटन विभाग यांच्या संयुक्त समन्वयातून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून झाली. त्यानंतर राष्ट्रगीत आणि राज्यगीताने कार्यक्रमाला प्रारंभ झाला. मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे पूजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निलेश पाटील यांनी प्रास्ताविक केले.

यानंतर उपस्थितांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. ‘घर घर संविधान’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना संविधानाच्या उद्देशिकेच्या प्रतींचे प्रातिनिधिक स्वरूपात वाटप करण्यात आले. यावेळी किल्ला परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ऐतिहासिक गडकिल्ल्यांचे जतन, संवर्धन आणि परिसराचे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा संकल्पही करण्यात आला.

संविधान हे देशाच्या एकात्मतेचे महत्त्वपूर्ण अधिष्ठान : आमदार दीपक केसरकर

यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेत संविधानातील मूलभूत मूल्यांचे प्रतिबिंब असल्याचे प्रतिपादन केले. सर्वांना समान न्याय, शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण, पर्यावरणाचा समतोल आणि जलस्रोतांचे संवर्धन याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळातच दूरदृष्टीने विचार केला होता. आज आपण हवामान बदल आणि पर्यावरण संवर्धनाबाबत चर्चा करतो; मात्र निसर्गाचा समतोल राखण्याचे महत्त्व शिवकालीन विचारांमध्येही प्रकर्षाने दिसून येते, असे त्यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान दिनाची घोषणा करून संविधानाच्या सन्मानाची परंपरा अधिक व्यापक केली, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ हा उपक्रम पुढे आला असल्याचे त्यांनी नमूद केले. भारतीय संविधानातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि प्रजासत्ताक मूल्यांमुळे विविध धर्म आणि जातींचे नागरिक एकत्रितपणे देशाच्या प्रगतीत योगदान देत आहेत. सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाची हमी देणारे संविधान हे देशाच्या एकात्मतेचे महत्त्वपूर्ण अधिष्ठान असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ठोस कार्यवाही करणार : आमदार निलेश राणे

आमदार निलेश राणे यांनी संविधानाचे महत्त्व अधोरेखित करत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या जतन आणि संवर्धनासाठी ठोस कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. आमदार दीपक केसरकर यांनी मांडलेल्या संवर्धनाच्या संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. यासाठी अधिवेशनानंतर पुरातत्त्व विभागासोबत बैठक घेऊन आवश्यक निधी आणि परवानग्यांबाबत कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली देशाला मिळालेल्या संविधानामुळे प्रत्येक समाजघटकाला समानता, न्याय आणि अधिकार प्राप्त झाले आहेत. देशाची एकता आणि अखंडता टिकवून ठेवण्यात संविधानाची भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे संविधानाचे महत्त्व केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता त्यातील मूल्ये वर्षभर आपल्या आचरणात आणली पाहिजेत, असे आवाहन आमदार राणे यांनी केले.

या कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी ऐश्वर्या काळुसे, तहसीलदार गणेश लवे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी निलेश पाटील, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, बाबा परब, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, तालुकाप्रमुख मंदार लुडबे, शहरप्रमुख राजू बिडये, अशोक तोडणकर, समाजकल्याण अधिकारी तुषार गवळी यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत संग्राम कासले आणि निलेश पवार यांनी केले. तसेच २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना आणि शूर जवानांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. ऐतिहासिक गडकिल्ल्यांचा वारसा जपत संविधानातील मूल्यांचा जागर करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

error: Content is protected !!