देवगड नगरपंचायतीत भाजपच्या उरल्या सुरल्या आशा धुळीला !

शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेसचा गट स्थापन ; गटनेतेपदी संतोष तारी

देवगड : देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाला प्रत्येकी ८ जागा मिळाल्या असून एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेली आहे. त्यामुळे या नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता उलथवून महाविकास आघाडीची सत्ता येण्याचे जवळपास निश्चित झाले असताना भाजपा समर्थकांकडून नगराध्यक्ष निवडणुकीत चमत्कार घडवून आणण्याचे बोलले जात होते. मात्र शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने निवडून आलेल्या नऊही सदस्यांचा गट स्थापन केला असून अपर जिल्हाधिकाऱ्यांकडे या गटाची नोंदणी केली आहे. त्यामुळे भाजपाच्या सत्तेत येण्याच्या उरल्यासुरल्या आशाही धुळीला मिळाल्या आहेत.

देवगड जामसंडे नगरपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने गट स्थापन केला आहे. तसे लेखी पत्र अप्पर जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग याना दिले आहे. या महाविकास आघाडीच्या गटनेतेपदी गट प्रमुख संतोष तारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख विलास साळसकर यांच्यासह शिवसेना व राष्ट्रवादी चे सर्व विजयी उमेदवार उपस्थित होते.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!