पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मालवणच्या वीज पुरवठ्यातील अडचणीवर आवश्यक उपाययोजना करा 

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी सहा. अभियंत्यांचे वेधले लक्ष : तात्काळ कार्यवाही करण्याची सहा. अभियंता म्हेत्रे यांची ग्वाही

बाजारपेठेतील वीज समस्येकडे प्राधान्याने लक्ष घालून व्यापारी वर्गाची गैरसोय दूर करा : गॅरी अन्ननसिएशन

मालवण : उन्हाळ्याच्या पर्यटन हंगामात मालवणात मोठ्या प्रमाणात वीज पुरवठ्याच्या समस्येमुळे वीज ग्राहक हैराण झाले. येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होत असल्याने निदान पावसाळा कालावधीत तरी शहर व परिसरात वारंवार वीज खंडित होण्याचे प्रकार थांबवण्यासाठी वीज वितरणने पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसेचे मालवण तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी वीज वितरणचे सहाय्यक अभियंता म्हेत्रे यांच्याकडे केली आहे.

मालवण बाजारपेठेत वीज पुरवठा खंडित होण्याचे तसेच कमी दाबाने वीज पुरवठा होण्याचे प्रकार घडत आहेत, यावर देखील उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली. त्यावर बाजारपेठेत नव्याने आणखी एक ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार असून त्यासाठी जागेचा शोध सुरु असल्याचे श्री. म्हेत्रे यांनी सांगितले.

याबाबत मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अद्याप पावसाळा सूरू व्हायचा असताना देखील मालवण परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. तसेच अनेक भागात कमी दाबाने वीज पुरवठा होत असून यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. घरगुती, व्यावसायिक तसेच शैक्षणिक कामांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. नजिकच्या काळात मान्सून दाखल होणार असल्याने हीं परिस्थिती कायम राहिल्यास वीज पुरवठ्याची गंभीर परिस्थिती मालवणात निर्माण होणार आहे.

येत्या काही दिवसात पावसाळा सुरु होणार असल्याने वीज वाहिन्यांजवळील झाडांच्या फांद्या छाटणे, धोकादायक झाडे हटविणे, तसेच वीज यंत्रणेची तपासणी व दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या उपाययोजना वेळेत केल्यास पावसाळ्यात होणारे वीजपुरवठ्याचे व्यत्यय कमी होतील व नागरिकांना दिलासा मिळेल. तरी आपण या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. या अनुषंगाने शहरात वीज वाहिन्यांवरील झाडें तोडण्याचे काम सुरु करण्यात आले असून विजेचे प्रश्न नागरिकांना भेडासाऊ नयेत, यासाठी सतर्क राहण्याची ग्वाही सहाय्यक अभियंता म्हेत्रे यांनी दिली आहे.

error: Content is protected !!