सावंतवाडीत ‘सेवा अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद; ३५० हून अधिक निवेदनांतून नागरिकांचा थेट आवाज

सिंधुदुर्गातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना भाजपकडून व्यासपीठ; प्रलंबित कामांसाठी प्रभावी पाठपुराव्याचे आश्वासन

सावंतवाडी : भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या संकल्पनेतून सोमवारी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सेवा अभियानाला’ उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काझी शहाबुद्दीन हॉल येथे झालेल्या या अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपल्या विविध समस्या, प्रलंबित विकासकामे आणि शासकीय प्रश्नांची निवेदने सादर केली. या अभियानात ३५० हून अधिक निवेदने स्वीकारण्यात आली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांनी आपल्या भागातील प्रलंबित कामे आणि विविध समस्यांबाबत महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण यांच्या नावाने निवेदने सादर केली. महाराष्ट्र विधान परिषद सदस्य, भाजप कोकण विभागाचे संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता प्रमोद जठार आणि संतोष साखरे यांनी नागरिकांकडून ही निवेदने स्वीकारली.

यावेळी नागरिकांनी रस्ते, पायाभूत सुविधा, स्थानिक विकासकामे, मूलभूत सुविधा तसेच विविध शासकीय प्रश्नांशी संबंधित समस्या मांडल्या. नागरिकांच्या प्रश्नांची प्रत्यक्ष माहिती जाणून घेत संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही यावेळी देण्यात आली.

‘सेवा अभियानामुळे’ सर्वसामान्य नागरिकांना आपल्या अडचणी थेट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसमोर मांडण्यासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले. केवळ समस्या ऐकून न घेता त्या संबंधित यंत्रणांपर्यंत पोहोचवून त्याच्या निराकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करण्याची भूमिका भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

या अभियानामुळे नागरिकांच्या स्थानिक प्रश्नांना संघटित स्वरूप मिळाले असून, निवेदनांच्या माध्यमातून सर्वसामान्यांचा आवाज पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रलंबित विकासकामांना गती मिळावी आणि नागरिकांच्या दैनंदिन अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी पुढील काळातही पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, संतोष साखरे, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, युवा नेते विशाल परब, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गावडे, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, मंडळ अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, मनोज नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, इपाली भालेकर, मधुसूदन देसाई, संतोष राऊळ यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘सेवा अभियानाच्या’ माध्यमातून नागरिकांच्या समस्या थेट वरिष्ठ नेतृत्वापर्यंत पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

error: Content is protected !!