मोकाट गुरांच्या त्रासाने व्यतिथ झालेल्या नागरिकाचा मालवण नगरपालिकेला इशारा


मालवण | कुणाल मांजरेकर
मालवण शहरात मोकाट गुरांचा प्रश्न गंभीर बनला असून प्रशासकीय राजवटीत पालिका प्रशासनाकडून याकडे सातत्याने दुर्लक्ष करण्यात आले. आता पालिका निवडणुकीनंतर शहरात लोकप्रतिनिधी कार्यरत झाले असून नगराध्यक्ष व उप नगराध्यक्षांनी या समस्येतून मार्ग काढावा. येत्या १५ दिवसात मोकाट गुरांचा बंदोबस्त न झाल्यास नाविलाजास्तव सुरक्षित स्थळ म्हणून कुटुंबासह पालिकेत स्थलांतरण करावे लागेल, असा इशारा दांडी येथील रश्मीन रमेश रोगे यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे.
श्री. रोगे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरात मोकाट फिरणाऱ्या गुरांवर उपाययोजना करण्यासाठी गेली बरीच वर्षे प्रशासकीय राजवटीच्या कालावधीत वारंवार मी ३ ते ४ वेळा प्रत्यक्ष तसेच फोनवरून बऱ्याच वेळा नगरपालिकेल गेलो होतो. परंतु म्हणावी तशी उपाययोजना झाली नाही. सध्या राहत्या घरी मोकाट जनावरांमुळे आम्ही कुटुंबीय असुरक्षित आहोत. ही मोकाट जनावरे कधीही सरळ आमच्या घरात प्रवेश करतात आणि ह्याचे फोटो आणि व्हिडीओ क्लिप नगरपालिकेच्या निदर्शनास आणून दिले होते. परंतु नगरपालिकेकडून माझ्या या समस्येस्चे निराकरण करण्यात आलेले नाही.
आता प्रदीर्घ प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतीनिधी निवडून आल्यामुळे मला त्यांच्याकडून आशा आहे की माझ्या या समस्येचा ते गांभीर्याने विचार करतील आणि मला योग्य तो न्याय देतील. तसे न झाल्यास नाईलाजाने सुरक्षित स्थळ म्हणून मला माझ्या कुटुंबासहित नगरपालिकेत स्थलांतर करावे लागेल त्यास सर्वस्वी आपली नगरपालिका जबाबदार राहील. मी आपणास यासाठी १५ दिवसाची मुदत देत आहे. तरी माझ्या या समस्येकडे आपण लक्ष देऊन त्वरित उपाययोजना कराल अशी मी आशा रश्मीन रोगे यांनी व्यक्त केली आहे. हे निवेदन त्यांनी नगराध्यक्ष ममता वराडकर व उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांना सादर केले आहे.
















Subscribe to my channel




