मालवण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध, शहर विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही : आमदार निलेश राणे


मालवण : आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मालवण नगरपालिकेसाठी नगरविकास खात्याकडून प्रथमच कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मालवण नगरपरिषद येथे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. आमदार निलेश राणे यांनी शासनाच्या माध्यमातून मंजूर करून आणलेल्या कोट्यावधी निधीतील विकासकामांचा आढावा घेण्यात आला. आ. निलेश राणे यांनी शुक्रवारी मालवण नगरपालिकेत प्रशासनासोबत आढावा बैठक घेत मंजूर कामे, प्रगतीपथावर असलेली कामे, प्रस्तावित कामे अश्या सुमारे ९० ते १०० कोटी निधीतील विकास कामांचा आढावा घेतला. या विकास कामांसोबतच आणखीही २५ ते ३० कोटी विकास निधी मालवण शहरासाठी लवकरच उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
स्वच्छ सुंदर मालवण शहर या संकल्पनेतून मालवण शहरासाठी जे जे काही करणे शक्य आहे ते सर्व काही केले जाईल. राज्य सरकार, अर्थसंकल्प तसेच नगर विकास खात्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात यश आले आहे. नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून अजूनही निधी उपलब्धतेसाठी प्रयत्नशील असल्याचे देखील आमदार निलेश राणे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
या आढावा बैठकी दरम्यान, आ. राणे यांच्याकडून नगरपरिषद परिसराची पाहणी करण्यात आली. तर मालवण नगरपरिषदेच्या नव्या सक्शन वाहनाचे लोकार्पणही करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर, मुख्याधिकारी प्रतीक थोरात, बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर, स्वच्छता आरोग्य सभापती पुनम चव्हाण, महिला बालकल्याण सभापती अन्वेषा आचरेकर, उपसभापती अश्विनी कांदळकर, मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सिद्धार्थ जाधव, नगरसेवक महेश कांदळगावकर, महेश कोयंडे, नगरसेविका शर्वरी पाटकर, मेघा सावंत, नीना मुंबरकर, भाग्यश्री मयेकर, महानंदा खानोलकर, दर्शना कासवकर, ललित चव्हाण, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे, युवासेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर, राजू बिडये, बबन शिंदे, मोहन वराडकर, परशुराम पाटकर, शेखर गाड, जॉन नऱ्होना, निषय पालेकर, दया देसाई, सुशील शेडगे तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
मालवण शहर विकासासाठी मिळालेल्या राज्य शासन, नगरोत्थान, अर्थसंकल्पीय अधिवेशन, जिल्हा वार्षिक योजना यासह विविध योजनांमधील कोट्यावधी निधीतील विकास कामाचा आढावा घेण्यात आला. शहरात रस्ते, गटार यासोबत अन्य महत्वपूर्ण योजनासाठी मोठया प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात आला. मामा वरेरकर नाट्यगृह इमारत आणि व्यवस्था सुसज्ज आणि दर्जेदार करणे, घनकचरा व्यवस्थापन, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स रॉक गार्डन, नमो उद्यान, हिंदूसम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियान, मत्स्यालय, भाजी मार्केट इमारत, शहर सुशोभीकरण यासोबत नळपाणी योजना, भुयारी गटार योजना याही योजनांच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. मागासवर्गीय वस्तीतील जमिनी नावे नसल्याने त्याठिकाणी निधी खर्च करताना अडचणी निर्माण होत असल्याबद्दल मागासवर्गीय कल्याण समिती सभापती सिद्धार्थ जाधव यांनी यावेळी आमदारांचे लक्ष वेधले. यावर शासन स्तरावर चर्चा करून कार्यवाही करण्यात येईल असे आमदार श्री.राणे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी आमदार नीलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांना अभिप्रेत असलेला शहर विकास करण्यासाठी आम्ही कटीबद्ध असल्याचे स्पष्ट केले. अधिवेशनात जनतेच्या हिताचे प्रश्न उपस्थित करून तसेच मतदार संघात मोठ्या प्रमाणात विकास निधी आमदार उपलब्ध करून देत आहेत. असेही नगराध्यक्षा यांनी सांगितले.
नगरपालिकेचे प्रवेशद्वार आकर्षक बनवण्याच्या सूचना
नगरपालिका इमारतीमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रसन्न आणि आनंदी वातावरण वाटले पाहिजे. यामुळे तळमजला आणि त्यापरिसरातील व्यवस्था ही दर्जेदार बनविली पाहिजे. नगरपालिकेत येणाऱ्या नागरिकांना याठिकाणी आल्यानंतर चांगल्या ठिकाणी आल्याचे समाधान वाटले पाहिजे. यामुळे प्रशासनाने प्रवेशद्वारावरील अडगळ आणि व्यवस्था सुस्थितीत करावी अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी दिल्या. शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी कचरा समस्या ही कायमस्वरूपी सुटण्यासाठी एक परिपूर्ण आराखडा बनविणे आवश्यक आहे. पालिकेने नवीन उपक्रम हाती घेण्यासाठी आणि त्याप्रमाणे प्रस्ताव सादर करावेत निधी उपलब्ध करून दिला जाईल, पण शहर विकासासाठी सर्वांनी काम करावे असेही त्यांनी सांगितले.
शहर विकासासाठी मोठा निधी उपलब्ध
नगरविकास खात्याकडून शहर विकासासाठी मोठा निधी निधी उपलब्ध झालेला आहे. यातून शहरातील रस्ते, गटार तसेच इतर प्राथमिक गरजा असलेली कामे प्राधान्यातून करताना प्रलंबित राहिलेले स्पोर्टस् कॉम्पेक्स आणि व्हिडीओ काढून चर्चेला आलेले मामा वरेरकर नाट्यगृह ही कामे तातडीने पूर्ण केली गेली पाहिजे. स्पोर्टस् कॉम्पेक्ससाठी पाच कोटी रूपये खर्च करून सर्व काम पूर्ण करण्यासाठी आतापासूनच नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. मालवणातील मुलांना सुसज्ज स्पोर्टस् कॉम्पेक्स उपलब्ध होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. नाट्यगृहामध्ये सर्व व्यवस्था पूर्ण करताना दर्जेदार नाट्यगृहाची निर्मिती होणे आवश्यक आहे.यासाठी तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन घेण्यात यावे,अशा सूचनाही श्री.राणे यांनी केल्या.
नमो उद्यान कार्यान्वित होणे आवश्यक
शासनाने नमो उद्यान योजनेतून तब्बल एक कोटी रूपयांचा निधी पालिकेला दिलेला आहे. शहरात नगरपालिकेची स्वत:ची जागा नसल्याने हा निधी अखर्चीत असल्याचे मुख्याधिकारी यांनी सांगताना आमदार राणे यांनी नमो उद्यान या योजनेतून मिळालेला एक कोटी रूपयांचा निधी आणि त्यानंतर उद्यान चांगल्या प्रकारे यशस्वी झाल्यानंतर होणाऱ्या स्पर्धेतून मिळणारा पाच कोटी रूपयांचा निधी आपल्याला मिळणार नाही. यामुळे शहरातील इतर ठिकाणच्या जागांचा शोध घेऊन उद्यान प्रकल्प साकारणे आवश्यक आहे. आपण फक्त रॉक गार्डन या एकाच गोष्टी भोवती फिरत आहोत. रॉक गार्डन बरोबर पर्यटकांना इतरही ठिकाणी चांगली व्यवस्था होण्यासाठी उद्यान निर्माण होणे आवश्यक असल्याचेही आमदार राणे यांनी स्पष्ट केले.
वाहतुकीच्या कोंडीवर पर्यायी मार्ग तयार करा
शहरात येण्यासाठी जो वेळ लागत आहे, तो कमी करण्यासाठी पर्यायी मार्गांचा अभ्यास करून त्यावर कार्यवाही करावी. कुंभारमाठ येथून थेट देवबागमध्ये जाण्यासाठी पर्यायी मार्गांचा अभ्यास करावा. तशाचप्रकारे शहरात येताना होणारी वाहतुकीची कोंडी कमी करण्यासाठी कोणालाही विस्थापित न करता पर्यायी मार्ग असलेल्या ठिकाणांचा अभ्यास करावा, अशी सूचना आमदारांनी केली. यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश आमदारांनी दिले.
नळपाणी योजना निश्चीत वेळेत पूर्ण व्हावी
नळपाणी योजनेच्या कामात अनेक अडचणी निर्माण केल्या जात असल्याची माहिती मिळत आहे, यामुळे मुख्याधिकारी यांनी यामध्ये लक्ष घालून शहरवासियांसाठी महत्वाची असलेली नळपाणी योजना पूर्ण होण्यासाठी सातत्याने काम पूर्ण होत असल्याच अहवाल घ्यावा, महत्वपूर्ण अशी योजना लवकर पूर्ण व्हावी. असेही आमदार यांनी सांगितले. भुयारी गटार योजनेच्या प्रलंबित कामासंदर्भातही त्यांनी प्रशासनाला तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर
भटक्या कुत्र्यांच्या बाबत आमदार राणे यांनी प्रशासनाला गांभिर्याने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. सागरी महामार्गावरील तसेच शहरातील भटक्या कुत्र्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव धोक्यात येण्याची भितीही यावेळी त्यांनी व्यक्त केली. योग्य ती कार्यवाही करण्यात यावी असे त्यांनी सांगितले.
















Subscribe to my channel




