टोपीवाला हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक प्रकाश प्रभू यांचे निधन
मालवण एज्युकेशन सोसायटीच्या सचिव पदावर देखील केले होते प्रभावी काम
मालवण : येथील अनंत शिवाजी देसाई टोपीवाला हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक तथा मालवण एज्युकेशन सोसायटीचे माजी सचिव, साहित्यिक प्रकाश गंगाराम प्रभू (वय-७८ रा. हुतात्मा स्मारक नजीक कुंभारमाठ) यांचे गुरुवारी रात्री ११ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले.
प्रकाश प्रभू यांचा जन्म कुडाळ तालुक्यातील वालावल येथे २१ जुलै १९४४ रोजी झाला. त्यांनी एमए बीएड चे शिक्षण घेतले. कुडाळ हायस्कूल मध्ये त्यांनी दीड वर्षे शिक्षक म्हणून सेवा बजावली. त्यानंतर १९७२ मध्ये ते टोपीवाला हायस्कूल येथे शिक्षण सेवेत रुजू झाले. मराठी, संस्कृत, इंग्रजी या विषयांमध्ये त्यांचा हातखंडा होता. विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ते ओळखले जात. १९८५ ते २००२ या काळात त्यांनी मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावली. मालवण एज्युकेशन सोसायटीचे ३५ वर्षे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. महाराष्ट्र राज्य शालांत प्रमाणपत्र परीक्षा बोर्ड कोल्हापूरचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी १५ वर्षे काम पाहिले. त्यांच्या कारकिर्दीत प्रशालेचा हिरक महोत्सव, शतक महोत्सव, टाइम कॅप्सूल हा उपक्रम राबविण्यात आला. मालवण एज्युकेशन सोसायटीच्या जय गणेश इंग्लिश मिडीयम स्कूलची स्थापनाही त्यांच्या कार्यकाळात झाली.
प्रकाश प्रभू हे साहित्यिक होते. त्यांच्या अनेक लेखमाला प्रसिद्ध झाल्या. सागर कैद यासह अन्य कांदबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या पालखी या लघुकथा संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा साहित्य पुरस्कारही त्यांना मिळाला होता. काल रात्री त्यांचे राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने वृत्त समजताच टोपीवाला हायस्कूल परिवार, आजी, माजी विद्यार्थ्यांच्या वतीने त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यांच्या मागे दोन मुलगे, विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे.