तहसीलदार कार्यालय आणि महाविद्यालयांच्या संयुक्त विद्यमाने मतदार नोंदणी शिबिर
सावंतवाडी : लोकशाही प्रक्रियेत युवकांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने भोसले नॉलेज सिटी येथे आयोजित मतदार नोंदणी शिबिरात २६८ विद्यार्थ्यांनी नवमतदार म्हणून नोंदणी केली.
तहसीलदार कार्यालय, सावंतवाडी तथा राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभाग, यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही महाविद्यालयांतील वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.
सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासह तहसीलदार कार्यालयातील निवडणूक शाखेचे कर्मचारी यावेळी उपस्थित होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारत निवडणूक आयोगाच्या ॲपद्वारे ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांची मतदार नोंदणी करण्यात आली.
पात्र युवकांना मतदानाचा हक्क मिळवून देणे, मतदानाचे महत्त्व पटवून देणे आणि लोकशाही प्रक्रियेबाबत जागरूकता निर्माण करणे, हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मतदार म्हणून नोंदणी करण्याची संधी मिळाली असून, लोकशाहीतील सक्रिय सहभागाच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले