वाढदिवस अभिष्टचिंतन विशेष


कुणाल मांजरेकर (मालवण)
मालवण नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे स्थानिक नेतृत्व महेश विश्वनाथ जावकर यांचा आज ५६ वा वाढदिवस. तब्बल २० वर्ष मालवण नगरपालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत असताना प्रशासकीय जाण असलेले अभ्यासू नेतृत्व म्हणून महेश जावकर यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. मागीलवर्षी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला असला तरी मालवण शहराच्या विकासासाठी सदैव कार्यरत राहणार असल्याचा विश्वास श्री. जावकर यांनी व्यक्त केला आहे.
८ जून १९७० रोजी मालवण शहरातील मोरे दवाखान्यात (म्हणजेच) आताच्या ग्रामीण रुग्णालयात महेश जावकर यांचा जन्म झाला. त्यांचे वडील मुंबईत नोकरीला होते. तर आई गृहिणी म्हणून घरात कार्यरत होती. विश्वनाथ यांना तीन मुलगे. यातील सर्वात लहान मुलगा म्हणजे महेश जावकर. महेश जावकर यांनी मालवण मध्येच आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. महाविद्यालयात असतानाच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आणि कोकणचे नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
मालवण शहराचा व प्रभागाचा शाश्वत विकास व्हावा, शहरामध्ये पर्यटन वाढावे, पायाभूत सुविधा व्हाव्यात यासाठी सन १९९६ च्या सुमारास महेश जावकर यांनी शिवसेनेकडून प्रथमच नगरसेवक म्हणून मालवण नगरपालिकेत प्रवेश केला. नारायण राणे यांच्या तालमीत वाढलेल्या या नि स्वार्थी, प्रेमळ, जनतेच्या प्रश्नासाठी आक्रमक होणाऱ्या आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात धावून जाणाऱ्या या जनसेवकाने त्यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. सलग चार वेळा नगरसेवक म्हणून काम करताना २०११ च्या निवडणुकीत अपक्ष नगरसेवक म्हणून चार वार्डातून निवडून येण्याचा मान त्यांनी मिळवला. त्यावेळी सत्ताधारी व विरोधक यांचे समसमान बलाबल असल्याने श्री. जावकर यांना थेट नगराध्यक्ष निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. मात्र तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेल्या पक्षपाती धोरणामुळे जावकर यांचा अर्ज बाद ठरवण्यात आला. त्यानंतर जावकर यांची उपनगराध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या कालावधीत त्यांनी जनतेच्या मनातील नगराध्यक्ष म्हणून काम केले. जनतेला दिलेला शब्द म्हणून कोणत्याही अमिषाला बळी न पडता पाच वर्ष अपक्ष म्हणून त्यांनी काम केले.
मालवण मधील मामा वरेरकर नाटयगृह, रॉक गार्डन उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान ठरले. शहरातील रस्ते रुंदीकरण, नवीन रस्ते, चिवला बिच बंधारा, बीच सुशोभिकरण, स्मशानभूमी सुशोभिकरण करण्याबरोबरच शहराला C.R.Z पासून लागलेला C.V.C.A सारखा क्रिटीकल झोन रद्द करण्यासाठी त्यांनी केंद्र व राज्य शासनाकडे यशस्वी पाठपुरावा केला. शहरासाठी नगर परिषद फंडावर अवलंबून न राहता राज्य, केंद्र शासनाकडून फंड उपलब्ध करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. U.I.S.M. T या केंद्र शासनाच्या योजनेत मालवणचे नाव समाविष्ट होण्या बरोबरच मालवणची आरोग्य व्यवस्था सुधारावी यासाठी तत्कालीन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याकडे त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
शहरातील स्थानिक पातळी वरील राजकारणामुळे त्यांनी काही वर्षांपूर्वी तत्कालीन आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे विभाजन झाल्यानंतर ते पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आमदार वैभव नाईक यांच्या सोबत कायम राहिले. मागील वर्षी झालेल्या नगरपालिका निवडणुकीत ठाकरे शिवसेनेने त्यांना प्रभाग ६ मधून उमेदवारी दिली. निवडणुकीपूर्वी काही महिने ते आजारी होते. त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना निवडणुकीत फिरता देखील आले नाही. तरीदेखील या प्रभागात झालेल्या तिरंगी लढतीत ते दुसऱ्या क्रमांकावर राहिले. तर तत्कालीन नगरसेवक तिसऱ्या क्रमांकावर गेला. आज ते नगरपालिकेत नसले तरी शहर वासियांच्या सेवेत कायम आहेत. अशा या दिलदार मनाच्या लोकसेवकाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!







Subscribe to my channel






