कुडाळमध्ये लाचखोर तलाठ्याला एसीबीचा दणका

सातबारा नोंदीसाठी ५ हजारांची लाच; रेल्वे ब्रिजजवळ रंगेहाथ पकडले; महसूल विभागात खळबळ!

कुडाळ : सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठीही पैशांची मागणी? कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जोरदार दणका दिला आहे. सातबारा उताऱ्यावर नोंद करून देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या आरोपावरून ग्राम महसूल अधिकारी जितेंद्र काळू खेताडे (वय २८) यांना कुडाळ-वेंगुर्ला मार्गावरील रेल्वे ब्रिजजवळ लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. शुक्रवार, २३ ऑक्टोबर रोजी झालेल्या या कारवाईने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका वकिलाने आपल्या अशिलाच्या सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी सुमारे दोन महिन्यांपूर्वी पिंगुळी तलाठी कार्यालयात प्रकरण दाखल केले होते. या कामाचा पाठपुरावा करताना तलाठी जितेंद्र खेताडे यांनी काम करून देण्यासाठी ५ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. लाच देण्यास नकार देत संबंधित वकिलाने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली.

एसीबीने रचला सापळा; रेल्वे ब्रिजजवळ कारवाई!

तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती आहे. त्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. तलाठी कार्यालयात भेट न झाल्याने फोनवरून संपर्क साधण्यात आला. त्यावेळी खेताडे यांनी तक्रारदाराला कुडाळ-वेंगुर्ला रस्त्यावरील रेल्वे ब्रिजजवळ बोलावले. तेथे ५ हजार रुपयांची रक्कम स्वीकारताना एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.

भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई

या प्रकरणी जितेंद्र काळू खेताडे यांच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) च्या कलम ७ अन्वये कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, ठाणे परिक्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सिंधुदुर्ग युनिटच्या पोलीस उपअधीक्षक संगिता पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. पथकात पोलीस निरीक्षक दीपक माळी यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी होते.

error: Content is protected !!