
भाजप महाराष्ट्र सहप्रभारी खासदार सदानंदशेठ तानावडे यांचे गौरवोद्गार; सावंतवाडीत भव्य महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा संकल्प अभियाना’च्या माध्यमातून समाजसेवेचा वसा जपण्याचे काम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत आहेत. भाजपचे युवा नेते विशाल परब यांनीही स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. राजकारणापलीकडे जाऊन समाजातील गोरगरीब जनतेची सेवा करण्याची त्यांची भावना कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार भाजप महाराष्ट्र सहप्रभारी खासदार सदानंदशेठ तानावडे यांनी काढले.
सावंतवाडी येथील जिमखाना मैदानावर आयोजित भव्य महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली, भाजप सिंधुदुर्ग आणि सह्याद्री फाउंडेशनच्या माध्यमातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी खासदार तानावडे यांनी विशाल परब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
समाजसेवेतून विकसित भारताच्या संकल्पनेला बळ
खासदार सदानंदशेठ तानावडे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पनेतून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाच्या सुविधा पोहोचविण्याचे काम सुरू आहे. अंत्योदयाचे तत्त्व जपत गरजू रुग्णांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न विशाल परब करत आहेत. घटस्थापनेपासून सुरू झालेल्या या आरोग्य अभियानाच्या माध्यमातून नामांकित रुग्णालये आणि तज्ज्ञ डॉक्टरांना ग्रामीण भागातील जनतेपर्यंत आणण्याचे महत्त्वपूर्ण काम करण्यात आले आहे. मोफत तपासण्या आणि उपचारांच्या सुविधांमुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळत आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून खर्चिक वाढदिवस सोहळे टाळत समाजोपयोगी उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. ‘बुकेऐवजी बंधारा आणि पोस्टरऐवजी आरोग्य शिबिर’ हा संदेश समाजाप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे दर्शन घडविणारा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
१६४ गावांतील जनतेसाठी वर्षभर सामाजिक उपक्रम
भाजप युवा नेते विशाल परब म्हणाले, वाढदिवस साजरा करताना केवळ शुभेच्छा, पोस्टर आणि सत्कार यापुरते मर्यादित न राहता समाजाला प्रत्यक्ष उपयोग होईल, असे उपक्रम राबविण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘बुकेऐवजी बंधारा, पोस्टरऐवजी आरोग्यसेवा’ हा विचार घेऊन आम्ही काम करत आहोत. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील १७ जिल्हा परिषद क्षेत्रे आणि तीन शहरांमध्ये महाआरोग्य शिबिरे आयोजित करण्यासोबतच जलसंधारणासाठी बंधारे उभारण्याचे कामही करण्यात आले आहे. १६४ गावांतील गोरगरीब जनतेसाठी वर्षाचे बाराही महिने सामाजिक कार्य सुरू ठेवण्याचा आमचा संकल्प आहे. राजकारणात मी कधीही कोणाला शत्रू मानले नाही आणि यापुढेही मानणार नाही. माझ्यावर टीका झाली तरी त्याला प्रत्युत्तर देण्याऐवजी विरोधकांना सुबुद्धी मिळावी, अशीच प्रार्थना करतो, असे त्यांनी सांगितले.
विशेष म्हणजे, हे आरोग्य अभियान केवळ काही दिवसांपुरते मर्यादित राहणार नसून, दर मंगळवारी जनसंपर्क कार्यालयात कायमस्वरूपी ओपीडी सुरू करण्यात येणार आहे. त्याद्वारे नामांकित रुग्णालयांच्या माध्यमातून गरजू रुग्णांना पुढेही आरोग्यसेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे विशाल परब यांनी स्पष्ट केले.
नामांकित रुग्णालयांचे तज्ज्ञ डॉक्टर एकाच छताखाली
सावंतवाडीच्या जिमखाना मैदानावर आयोजित या महाआरोग्य शिबिरासाठी बेळगाव येथील प्रसिद्ध केएलई रुग्णालयाची ९२ जणांची टीम सहभागी झाली होती. याशिवाय पुण्यातील रुबी हॉल क्लिनिक, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, ज्युपिटर रुग्णालय आणि कोल्हापूर येथील लोकमान्य व अथायू रुग्णालयांतील तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून रुग्णांची तपासणी व उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. शिबिरात नेत्रतपासणी, मोफत चष्मेवाटप, ईएनटी तज्ज्ञांकडून तपासणी, गरजूंना श्रवणयंत्रे, दिव्यांगांसाठी काठ्या व वॉकर, तसेच टू-डी इको आणि ईसीजी यांसारख्या तपासण्यांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मळेवाड येथे आयोजित शिबिरात आढळलेल्या किडनी प्रत्यारोपणाची गरज असलेल्या दोन रुग्णांच्या उपचारांचा खर्च शासकीय योजनांच्या माध्यमातून आणि विशाल परब यांच्या सहकार्याने करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
या आरोग्य अभियानांतर्गत आतापर्यंत जवळपास पाच हजार रुग्णांनी लाभ घेतल्याची माहिती देण्यात आली. ग्रामीण आणि दुर्गम भागातील रुग्णांना मोठ्या शहरांतील नामांकित रुग्णालयांच्या आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे.
कार्यक्रमाच्या प्रारंभी आयुष हॉस्पिटलचे संचालक अनंत सरनाईक यांनी विशाल परब यांना कोल्हापुरी फेटा बांधून सन्मानित केले. महिला शहराध्यक्षा मोहिनी मडगावकर आणि पदाधिकाऱ्यांनी रोप भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा गौरव करण्यात आला.
याप्रसंगी भाजप महाराष्ट्र सहप्रभारी खासदार सदानंदशेठ तानावडे, भाजप युवा नेते विशाल परब, सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, मिशन फॉर लोकल पेडणेचे अध्यक्ष राजन कोरगावकर, पंचायत समिती उपसभापती गौरव मुळीक, मनोज नाईक, आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, राजू बेग, शिवानी नाईक, मोहिनी मडगावकर, दिपाली भालेकर, रवींद्र मडगावकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, मधुकर देसाई, जितेंद्र गांवकर, ॲड. सिद्धार्थ भांबुरे, नीलम नाईक, सुकन्या टोपले, सह्याद्री फाउंडेशनचे सुनील राऊळ, सुनिता पेडणेकर, प्रसन्न देसाई, हितेन नाईक, विनेश तावडे, पुखराज पुरोहित, प्रशांत सुकी, प्रथमेश सावंत, आत्माराम ओटवणेकर, प्रकाश मोर्ये, दुलारी रांगणेकर, विलास जाधव आदींसह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी ॲड. अनिल निरवडेकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील बांदा, मळेवाड, दोडामार्ग, वेंगुर्ला आणि आंबोली या भागांत आयोजित मोफत महाआरोग्य शिबिरांचा आढावा घेतला. या शिबिरांमधून हजारो रुग्णांना तपासणी व औषधोपचारांचा लाभ मिळाल्याचे त्यांनी सांगितले. नेत्रतपासणीदरम्यान मोतीबिंदूचे रुग्ण शोधून त्यांच्या उपचारांची व्यवस्था करण्यात आली. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या टेलिमेडिसिन सुविधाही गरजूंसाठी उपयुक्त ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. पुखराज पुरोहित, सह्याद्री फाउंडेशनचे सुनील राऊळ आणि गोव्याचे नेते राजन पेडणेकर यांनीही मनोगत व्यक्त करून विशाल परब यांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी आणि निलेश गुरव यांनी केले, तर ॲड. सिद्धार्थ भांबुरे यांनी आभार मानले.
वाढदिवसाच्या निमित्ताने समाजसेवेचा संकल्प आणि आरोग्यसेवेच्या माध्यमातून जनतेला मदतीचा हात देण्याचा हा उपक्रम सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात चर्चेचा विषय ठरला.







Subscribe to my channel






