मालवण नगरपरिषदेकडून प्लास्टिक (SUP) विरोधात विशेष धडक कारवाई

१०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त : ५,३०० दंड वसूल

मालवण : पर्यावरण संरक्षण तसेच स्वच्छ व प्लास्टिकमुक्त शहराच्या दृष्टीने मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहर हद्दीत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक (Single Use Plastic – SUP) विरोधात विशेष धडक मोहीम राबविण्यात आली.

या मोहिमेदरम्यान शहरातील विविध दुकाने, व्यावसायिक आस्थापने तसेच फेरीवाल्यांची तपासणी करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ८ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधितांकडून ५,३०० इतका दंड वसूल करण्यात आला. तसेच सुमारे १०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले.

कारवाईदरम्यान व्यापाऱ्यांना शासनाने घालून दिलेल्या प्लास्टिक बंदीच्या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पर्यावरणपूरक पर्यायांचा वापर करावा तसेच प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या, कप, प्लेट, चमचे व इतर एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक वस्तूंची विक्री अथवा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले.

मालवण नगरपरिषदेकडून अशा प्रकारच्या तपासणी व कारवाया यापुढेही नियमितपणे सुरू राहणार असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शहर प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्यासाठी नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांनी नगरपरिषदेला सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले.

error: Content is protected !!