वायरी किनारपट्टीवरील ‘ते’ बोगस काम पतन विभागाने हटवले ; हरी खोबरेकर यांनी केला होता पर्दाफाश

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निकृष्ट कामांवर यापुढेही वचक ठेवणार : हरी खोबरेकर यांचा इशारा

मालवण : तालुक्यातील वायरी जाधववाडी ते रेवंडकर घर रस्त्याचे काम ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या मागणी नंतर सुरू झाले आहे. मात्र या कामाच्या काँक्रीटमध्ये काळ्या दगडा ऐवजी जांभ्या दगडाचा वापर होत असल्याचा प्रकार दोन दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव श्री. खोबरेकर यांनी निदर्शनास आणून दिला होता. या पार्श्वभूमीवर पतन विभागाकडून हे निकृष्ट काम हटवण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष निकृष्ट कामांवर यापुढेही वचक ठेवणार असून शासनाच्या तिजोरीतून ठेकेदारांची पोटे भरू देणार नाही, असा इशारा हरी खोबरेकर यांनी दिला आहे.

दोन दिवसांपूर्वी हरी खोबरेकर यांनी कामाच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता येथे काँक्रिट मध्ये काळ्या दगडा ऐवजी जांभा दगड वापरल्याचा प्रकार उघडकीस आला होता. तसेच कामाच्या ठिकाणी निकृष्ट दर्जाची वाळू वापरण्यात आली असल्याचे खोबरेकर यांनी म्हटले होते. हे काम आता पत न विभागाने काढून टाकले आहे. याबद्दल हरी खोबरेकर यांनी समाधान व्यक्त केले असून यानंतर देखील तालुक्यात विकास कामात भ्रष्टाचार खपवून घेणार नसल्याचा इशारा दिला आहे. जनतेच्या हितासाठी आमचा पक्ष आणि आमचे शिवसैनिक नेहमीच जागरूक असणार असल्याचेही तालुकाप्रमुख हरी खोबरेकर म्हणाले.

error: Content is protected !!