सावंतवाडी : युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, व्यायामाची आवड आणि क्रीडासंस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सावंतवाडीत रविवार, १ नोव्हेंबर २०२६ रोजी भव्य शरीरसौष्ठव (बॉडीबिल्डिंग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. जगन्नाथराव भोसले उद्यान येथे सायंकाळी ६ वाजता या स्पर्धेचा थरार रंगणार असून भाजपचे युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘फिट इंडिया’ संकल्पनेतून प्रेरणा घेत, भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग आणि सावंतवाडी युवा मोर्चाचे अध्यक्ष हितेन नाईक यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या स्पर्धेत शरीरसौष्ठवपटूंची ताकद, मेहनत, शिस्त आणि जिद्द यांचे दर्शन घडणार आहे. शरीरसौष्ठव क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासोबतच युवकांमध्ये व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करण्याचा या आयोजनामागील उद्देश आहे.
या कार्यक्रमाला सावंतवाडीचे उपनगराध्यक्ष अनिल निरवडेकर तसेच ज्येष्ठ नेते आणि युवकांचे प्रेरणास्थान विनोद राऊळ यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तरी या शरीरसौष्ठव स्पर्धेचा थरार अनुभवण्यासाठी आणि स्थानिक खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.