मालवण : मालवण शहर प्लास्टिकमुक्त व स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषदेच्या आरोग्य विभागातर्फे सोमवारी शहरातील आठवडा बाजारपेठेत सिंगल यूज प्लास्टिकविरोधी विशेष मोहीम राबवली. या कारवाईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यापारी व नागरिकांकडून ३,०५० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नगराध्यक्ष ममता वराडकर व मुख्याधिकारी प्रतिक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मोहिमेदरम्यान सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. दंड भरण्यास नकार देणाऱ्या किंवा नगरपरिषद कर्मचाऱ्यांच्या शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार विक्रीस मनाईची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. यापुढेही प्लास्टिक वापराविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असून, नागरिकांनी सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळावा आणि निर्माण होणारा घनकचरा नगरपरिषदेकडे सुपूर्द करावा, असे आवाहन करण्यात आले.
कारवाईवेळी प्रशासकीय अधिकारी संध्या गवळी, स्वच्छता निरीक्षक संजय पवार, स्वच्छता लिपिक मंदार केळुसकर यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. “प्लास्टिकला नकार, स्वच्छतेला होकार” या संदेशासह नगरपरिषदेने नागरिकांना प्लास्टिकमुक्त मालवणसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.