महाराष्ट्राच्या विकासाला दिल्लीचा ‘बूस्टर’; फडणवीसांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील विविध विकास प्रकल्पांसह केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयातून राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाच्या योजना आणि प्रकल्पांबाबत दोन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्रातील विविध विकासकामांची तसेच आगामी प्रकल्पांची पंतप्रधान मोदी यांना सविस्तर माहिती दिली. केंद्र सरकारच्या सहकार्याने राज्यात सुरू असलेल्या आणि प्रस्तावित प्रकल्पांना अधिक गती देण्यासाठी आवश्यक सहकार्याची मागणीही त्यांनी यावेळी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेली प्रत्येक भेट आपल्याला नवी ऊर्जा देणारी असते, अशी भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली. विकासाच्या विविध प्रश्नांवर पंतप्रधान मोदी यांचे बहुमूल्य मार्गदर्शन मिळते, तसेच महाराष्ट्राच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून मिळणारा भक्कम पाठिंबा कायम प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

“महाराष्ट्राच्या विकासाच्या प्रश्नांवर बहुमूल्य मार्गदर्शन आणि महाराष्ट्राला भक्कम पाठिंबा यासाठी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नितांत आभारी आहे,” अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेटीनंतर व्यक्त केली.या भेटीमुळे महाराष्ट्रातील विविध महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांना केंद्राच्या सहकार्याने आणखी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!