उदय सामंतांकडून पैशाच्या जोरावर शिवसेना फोडण्याचे षड्यंत्र ; खा. विनायक राऊत यांचा गंभीर आरोप
वैभव नाईकांच्या ऐवजी त्या “क्वारीवाल्याला” उमेदवारी देण्यासाठी दोनवेळा माझ्याकडे ठेवला होता प्रस्ताव
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वैभव नाईक यांच्या विरोधातील उमेदवाराला लाखोंची केली होती मदत
उदय सामंत यांनी मस्ती थांबवावी ; पुढील निवडणूकीत शिवसैनिक २५ हजारांनी पराभव करणार
मालवण | कुणाल मांजरेकर
शिवसेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत यांनी शनिवारी झालेल्या मालवण तालुका शिवसेनेच्या बैठकीत शिंदे गटातील कॅबिनेट मंत्री उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. उदय सामंत पूर्वीपासूनच गद्दार होते. पालकमंत्री असताना नारायण राणेंच्या विरोधात एकही निर्णय त्यांनी घेतला नाही. उलट २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत कुडाळ – मालवण मधून वैभव नाईक यांना उमेदवारी न देता त्यांच्या मर्जीतील त्या “क्वारीवाल्याला” उमेदवारी द्यावी आणि वैभव नाईक यांना विधान परिषदेतून आमदार म्हणून निवडून आणावे, असा प्रस्ताव दोनवेळा उदय सामंतांनी माझ्याकडे ठेवला होता. मात्र वैभव नाईक हा कडवट शिवसैनिक असल्याने हा प्रस्ताव मी नाकारल्यानंतर मागील विधानसभा निवडणुकीत वैभव नाईकांच्या विरोधातील उमेदवाराला लाखोंची मदत उदय सामंत यांच्याकडून करण्यात आली, असा गंभीर आरोप खा. राऊत यांनी केला आहे. दीपक केसरकर आणि उदय सामंत शिवसेनेतून शिंदे गटात गेले. मात्र उदय सामंत यांनी सिंधुदुर्गातील शिवसेना पैशाच्या जीवावर फोडण्याचा विडा उचलला असून परशुराम घाटापासून दोडामार्गच्या मांगेली पर्यंत शिवसेनेच्या विभागप्रमुखांना पैशाची आमिषे दाखवून आपल्याकडे वळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी स्वतःला वेळीच आवरावे, असा गर्भित इशारा खा. राऊत यांनी दिला आहे.
मालवण तालुका शिवसेना कार्यकारणीची बैठक जानकी हॉल कुंभारमाठ येथे संपन्न झाली. त्यावेळी खा. विनायक राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी आ. वैभव नाईक, शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हा समन्वयक प्रदीप बोरकर, संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, बाळा गावडे, भाई गोवेकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बबन शिंदे, नागेंद्र परब, जान्हवी सावंत, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बबन बोभाटे, जयभारत पालव, महेश कांदळगावकर, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, मंदार केणी, यतीन खोत, पंकज सादये, नितीन वाळके, बाबी जोगी, बाबा सावंत, गणेश कुडाळकर, बाळ महाभोज, अतुल बंगे, बाळू पालव, स्नेहा दळवी, दीपा शिंदे, पूनम चव्हाण, आकांक्षा शिरपुटे, सेजल परब, रश्मी परुळेकर, श्वेता सावंत, देवयानी मसुरकर, अमित भोगले, मंदार ओरसकर, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी खा. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात कुठेही न घडत असलेले अत्यंत घाणेरडे राजकारण रत्नागिरीतील पालीच्या घरातून उदय सामंत करत आहेत. गेल्या अडीच वर्षात पालकमंत्री पदाच्या कारकिर्दीत नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोसण्याचे काम केले. वैभव नाईक यांना विधानपरिषदेवर निवडुन आणून मालवण तालुक्यातील त्यांच्या आडनाव बंधूला पक्षामध्ये घेऊन त्याला आमदार करूया अशी मागणी उदय सामंत यांनी माझ्याकडे दोनवेळा केली. केली. मात्र भाडोत्री लोकांना घेण्यापेक्षा वैभव नाईक हे सिंधुदुर्गचे वैभव आहेत तेच आमदार होणार असे स्पष्ट करुन उदय सामंत यांची मागणी मी धुडकावून लावली. त्यानंतर विधानसभा निवडणूकीत वैभव नाईक यांच्या विरोधी उमेदवाराला त्यांनी लाखोंची मदत केल्याचा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी केला. कोल्हापूर, पुणे येथेही शिवसेना फोडण्यासाठी उदय सामंत शिवसैनिकांना पैशाची आमिषे देत असून पैशाच्या जोरावर शिवसेना संपवण्याचे प्रयत्न करीत आहे. मात्र नारायण राणेंसारख्याला शिवसेनेने संपवले, तिकडे उदय सामंत काय चीज ? शिवसेना संपवणे अशक्य असून उदय सामंत यांचे पैसे फळाला येणार नाहीत. आगामी विधानसभा निवडणुकीत उदय सामंत यांचा शिवसैनिक २५ हजारांनी पराभव करणारच, असा इशारा त्यांनी दिला. पालकमंत्री असताना किती टक्केवारी घ्यायचे हे सर्वज्ञात आहे. वॉटर प्युरिफायर घोटाळ्यातील चौकशी अहवालात त्यांच्या स्विय सहाय्यकाचे नाव होते. शिवसेनेने आवाज उठवूनही याची पारदर्शक चौकशी झाली नाही. मात्र या घोटाळ्यातील सहभागी असलेल्यांवर कारवाई झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, असे विनायक राऊत म्हणाले.
शिवसेनेच्या संघटनेचे पुनरुज्जीवन सुरू असून प्रत्येक जि. प. मतदारसंघामध्ये प्रत्येकी अडीच हजाराची नोंदणी व्हायलाच हवी, त्यासाठी पदाधिकाऱ्यांनी काम करावे. ज्याला संघटनेला वेळ देणे शक्य नाही, अशांनी पद रिक्त करून दुसऱ्या व्यक्तीला संधी द्यावी, अशी सूचना विनायक राऊत यांनी केली. सिंधुदुर्गात अतिरिक्त विमान सोडावे, यासाठी मी केंद्रीय विमान उड्डयनमंत्री ना. ज्योतीरादित्य सिंधीया यांच्याकडे पाठपुरावा केला. मात्र त्याचे श्रेय दुसरेच घेत आहेत, असेही राऊत म्हणाले.
यावेळी गौरीशंकर खोत म्हणाले, सध्याचे संकट शिवसेनेवर नसून महाराष्ट्रावर आहे. जिल्ह्यात उदय सामंत, दीपक केसरकर, नारायण राणे व भाजप अशी चार संकटे आहेत. पण, कितीही संकटे आली तरी शिवसेना मोठी होत गेली. म्हणूनच मोदी- शहा यांनी शिवसेना फोडली. आज बंडखोरांकडून प्रती शिवसेना भवन उभारणार असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे आपण कबरीमध्ये रुपांतर करूया असे त्यांनी सांगितले.
अरुण दुधवडकर म्हणाले, शिवसेना सोडून गेलेले गद्दार शिवसेना आमची, चिन्ह आमचे बाळासाहेबांचे आम्ही शिवसैनिक अशा वल्गना करत आहेत. मात्र मंत्रिमंडळाच्या शपथविधी वेळी यातील एकानेही बाळासाहेबांचे नाव घेतले नाही. यावरून यांचे शिवसेना प्रेम दिसून येते. एकनाथ शिंदे या सतांतराला क्रांती म्हणत असले तरी गावागावात यांना कोण चांगले म्हणत नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी त्यांनी शिवसेना सोडली. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचले आहे. मात्र सर्व शिवसैनिकांनी मिळून शिवसेना पुन्हा जोमाने वाढवायची आहे. यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी गावागावात जावून लोकांना भेटा. त्यांची कामे करा व जास्तीत जात शिवसेना सदस्य नोंदणी करा असे आवाहन त्यांनी केले.
आ. वैभव नाईक म्हणाले, मागील काही दिवसांतील घडामोडीत उद्धव ठाकरेंच्या पाठिशी उभे राहीले, तेच कट्टर शिवसैनिक आहेत. वास्तविक पक्षात फुट पडली असली तरी अनेकांचे पक्षप्रवेश होत आहेत, हीच शिवसेनेची ताकद आहे. यापूर्वी केसरकर, सामंत यांच्या मंत्रीपदाचा आपणाला किती फायदा झाला हे सर्वांनाच माहिती आहे. वास्तविक मी कुडाळ मालवणमधून उभा राहीलो तेव्हा टेबल लावायला देखील कार्यकर्ते नव्हते, तरीही जिंकलो. आता तर तशी परिस्थिती नाही. आपण सर्वानी मेहनत घेऊन येणाऱ्या निवणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा फडकवायचा आहे. गरज लागेल तिथे मी आपल्या पाठीशी राहीन. जोमाने कामाला लागा. लोकांशी संपर्क वाढवा असे आवाहन त्यांनी केले.