आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ

४०० आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांचा दोन वर्षांच्या प्रायोगिक प्रकल्पात सहभाग; हवामान बदलाच्या आव्हानांवर ‘AI’ तंत्रज्ञानाचा बूस्टर डोस

सिंधुदुर्ग : बदलत्या हवामानाचा आंबा आणि काजू उत्पादनावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सिंधुदुर्गातील शेतीला आता कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. जिल्ह्यातील ४०० आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांचा समावेश असलेल्या AI आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रायोगिक प्रकल्पाचा शुभारंभ पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सिंधुदुर्गच्या शेती क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता या प्रकल्पात असून, AI आधारित स्मार्ट शेती जिल्ह्याच्या कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाची क्रांती घडवेल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत कृषी विभागाच्या माध्यमातून कृषी विज्ञान केंद्र आणि अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या सहकार्याने हा दोन वर्षांचा प्रायोगिक प्रकल्प राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील आठही तालुक्यांमधून २०० आंबा उत्पादक आणि २०० काजू उत्पादक, अशा एकूण ४०० शेतकऱ्यांचा प्रकल्पात समावेश केला जाणार आहे.

हवामान बदलाच्या आव्हानांवर तंत्रज्ञानाची साथ

पालकमंत्री नितेश राणे म्हणाले, गेल्या दीड-दोन वर्षांत बदलत्या हवामानाचा सिंधुदुर्गातील आंबा आणि काजू फळपिकांवर परिणाम झाला आहे. या आव्हानांवर मात करण्यासाठी पारंपरिक शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठे आणि शासनाच्या माध्यमातून शाश्वत उपाययोजनांवर काम सुरू आहे. त्याचबरोबर AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीसमोरील विविध अडचणींचे विश्लेषण करून त्यावर प्रभावी उपाय शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.

जगातील अनेक देश शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करीत आहेत. सिंधुदुर्गातील शेतकरीही तंत्रज्ञानाच्या बाबतीत मागे राहू नयेत, यासाठी जिल्ह्यातील शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली जात आहे. शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी उत्पादन वाढविणे, खर्च कमी करणे आणि शेती अधिक शाश्वत करणे आवश्यक आहे.

नव्या पिढीला शेतीकडे आकर्षित करण्यासाठी AIआधुनिक तंत्रज्ञान आणि AI च्या माध्यमातून शेती अधिक सोपी, शास्त्रशुद्ध आणि उत्पादनक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. नव्या पिढीला शेतीकडे आकर्षित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आवश्यक आहे. सिंधुदुर्गचे दरडोई उत्पन्न ४.५० लाख रुपयांचा टप्पा पार करण्यासाठी प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानाधारित उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार आहे, असेही नितेश राणे यांनी सांगितले. हा प्रकल्प पारदर्शक पद्धतीने राबविण्यात येणार असून, शेती क्षेत्रात दीर्घकालीन परिवर्तन घडविण्यासाठी तो महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

AI करणार पिकांचे विश्लेषण; शेतकऱ्यांना मराठीत मार्गदर्शन

प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचे शास्त्रज्ञ विवेक भोईटे यांनी सादरीकरणाद्वारे प्रकल्पाची माहिती दिली. तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीचे व्यवस्थापन अधिक अचूकपणे करता येत असून, उत्पादन वाढविणे, उत्पादन खर्च कमी करणे आणि पीक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी AI चा उपयोग होत असल्याचे त्यांनी सांगितले. आंबा आणि काजू पिकांशी संबंधित विविध माहिती एकत्रित करून AI प्रणालीच्या माध्यमातून तिचे विश्लेषण केले जाणार आहे. त्यानुसार पिकांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक उपाययोजना आणि मार्गदर्शन शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाईल. ‘कृषक मोबाईल प्रणाली’च्या माध्यमातून शेतकऱ्यांना मराठी भाषेत सहज समजेल अशा पद्धतीने आवश्यक मार्गदर्शन मिळणार आहे.

सेन्सर्सपासून उपग्रह छायाचित्रांपर्यंत तंत्रज्ञानाचा वापर

या प्रकल्पात स्थानिक हवामान केंद्रे, मृदा सेन्सर्स, IoT तंत्रज्ञान, उपग्रह छायाचित्रे, AI आधारित पीक निरीक्षण आणि डिजिटल मॅपिंग यांचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे हवामान, माती, पीकस्थिती आणि इतर संबंधित माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना अधिक अचूक मार्गदर्शन देणे शक्य होणार आहे. प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला येथे डिजिटल वॉर रूम स्थापन करण्यात येणार असून, जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात डिजिटल डॅशबोर्डची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी हा प्रकल्प सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरेल, असे सांगितले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी आरती देसाई, उपजिल्हाधिकारी प्रतिभा वराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांच्यासह विविध अशासकीय संस्थांचे प्रतिनिधी, प्रगतिशील शेतकरी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

error: Content is protected !!