सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते होणार शुभारंभ


खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
मालवण : महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग, पुरातत्व व वस्तूसंग्रहालचे संचालनालय यांच्या वतीने मालवण तालुक्यातील नांदोस शिवकालीन गढी (नांदोस गड) पुरातत्वीय उत्खनन सोहळा महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते रविवार दि. ७ डिसेंबर रोजी सकाळी १०.३० वा. नांदोस येथे संपन्न होत आहे.
खासदार नारायण राणे यांच्या विशेष उपस्थितीत तसेच राज्याचे मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे व आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
नांदोस शिवकालीन गढी (नांदोस गड) याबाबत नांदोस उपसरपंच विजय सुहास निकम यांनी माहिती देताना सांगितले, ऐतिहासिक दस्तऐवज व प्राप्त संग्रहित माहितीच्या आधारे स्वतंत्र राज्याप्रमाणे आपणासही मोर्चेल असावे अशी सावंतवाडीकरांची झालेली इच्छा पेशव्यांचे सरदार महादजी शिंदे यांनी पूर्ण केली. त्यांनी मोगलांकडून ११ मे १७८५ रोजी मोर्चेल सावंतांना मिळवून दिली. ही खबर सावंतांनी आपले पूर्वीचे धनी करवीरकरांना दिली. करवीरकरांना ही गोष्ट पसंत पडणे शक्य नव्हते. १७८६ मध्ये रांगणा मालवण मार्गावरील कट्टा जवळ वेताळगड बांधण्यास घेतला. सावंतांची आगळीक वाढत चालली तेव्हा सन १७८७ मध्ये करवीरच्या फौजांनी आपल्या छत्रपतींच्या नेतृत्वाखाली घोटगे घाटाने खाली उतरुन सावंतांच्या मुलुखात धुमाकूळ घालीत बराच मुलुख काबीज केला. पोर्तुगीज सावंतांच्या मदतीस आले. करवीरच्या फौजा मालवणहून सावंतवाडीवर स्वारीस निघाल्या असता वाटेत नांदोस येथे तळ दिला.
याच नांदोस जवळ काही महिन्यांपूर्वी सावंतांनी वेताळगड बांधला होता. करवीरच्या फौजेस परतविण्यासाठी रात्रीच्या वेळी सावंतांच्या फौजा नांदोसच्या जंगलात लपून राहिल्या सावंतांनी जंगलाच्या आश्रयाने करवीर सैन्यावर पहाटे हल्ला चढविला. करवीरच्या फौजा सावध होत्या. करवीरकरांच्या घोडदळापुढे सावंतांच्या पायदळाचे काहीही चालले नाही. सावंतांचे सैन्य पराभूत होऊन पळत सुटले. सावंतांचे सरदार शिवराम सबनीस, सोम सावंत, माणगांवकर भोसले, परमेकर देसाई व गैरेंना करवीरच्या फौजेने कैद करून त्यांना सिंधुदुर्गच्या किल्ल्यात कैदेत ठेवले. नांदोस येथे सावंतांचा पराभव केल्यावर लवकरच करवीरकरांनी सावंतांनी बांधलेला वेताळगड काबीज केला. नांदोस येथे यावेळी किल्ला बांधण्यात आला नाही. काही वर्षानंतर सन १८०५ मध्ये सावंतवाडी अंतर्गत कलहात गुंतले असता फोंड सावंतांच्या विनंतीवरून करवीर छत्रपती हे करवीरहून १५ ऑगस्ट १८०५ रोजी निघाले. सावंतांच्या मुलुखात चाल करीत त्यांचे काही किल्ले घेत छत्रपतींनी नांदोस येथे तळ दिला आणि याच वेळी त्यांनी नांदोस येथे किल्ला बांधला.
म्हणजेच सन १८०५ मध्ये नांदोसचा किल्ला बांधला गेला. १५ फेब्रुवारी १८०७ रोजीच्या पत्रात नांदोसचा किल्ला कधी बांधला याची माहिती मिळते ती अशी ” माधवराव सबनिस व धोंडो गोविंद व वरकड सरदार च्यार हजार पर्यंत जमियेत (सैन्य) वरकड जागेचा बंदोबस्त करून मालवणच्या अलीकडेच गनिमाने (करविरकर) नांदोसीवर या च्यार वर्षात नवीन ठाणे बांधले होते.” म्हणजेच या पत्रानुसार गड सन १८०३ मध्ये बांधला गेला.
नांदोसची उभारणी सन १८०३ ते १८०५ दरम्यान झाली एवढे निश्चित, नांदोस स्थळी करवीरकरांनी भुईकोट किल्ला बांधला. त्यास मजबुती यावी म्हणून किल्ल्याच्या चौबाजूस खंदक खणले. ह्या नवीन किल्ल्याचा त्रास अर्थातच सावंतांना होणार होता. सावंतांना नांदोसचे अस्तित्व खटकू लागले. लक्ष्मीबाई सावंतानी आपले सैन्य नांदोसवर पाठवले. नांदोस येथे लढाई झाली. सावंतांचा पराभव होऊन त्यांचा सरदार धोंडो गोविंद सावंत ठार झाला. सावंतांची पिछेहाट झाली. हे पाहून लक्ष्मीबाईचा भाऊ रामचंद्र खानविलकरने फौजेची जमवाजमव करून चंद्रोबा सुभेदार तसेच इतर सरदारांना बरोबर घेऊन तयारी चालविली. दरम्यान करवीरचे छत्रपती आपल्या प्रमुख सैन्यासह कोल्हापुरास निघून गेले होते.
करवीर छत्रपती नसल्याचे पाहून सावंतानी खानविलकरांच्या नेतृत्वाखाली नांदोसवर चाल केली. दोन्ही पक्षात तुंबळ लढाई लढली गेली. करवीरकरांचे सुमारे अडीचशे लोक ठार झाले. करवीरकरांनी माघार घेतली. सावंतानी नांदोसचा किल्ला ताब्यात घेतला. आता पुन्हा करवीरकरांच्या फौजा नांदोसवर चालून येणार हे सावंत जाणून होते. त्यांना रोखणे कठीण, तेव्हा खानविलकराने नांदोस किल्ला पाडण्यास सुरुवात केली, जेणेकरून करवीर सैन्याचा तळ नांदोस येथे राहू नये.
नांदोस घेण्यासाठी करवीरहून व मालवणहून करवीरचे सैन्य निघाले. नांदोस करवीरकरांनी घेतला असणार, किल्ल्याचे काय झाले? करवीरकरांनी पुन्हा त्याची दुरुस्ती केली अथवा तो ओसच पडला याविषयी काही माहिती मिळत नाही. मात्र नांदोस हे मालवण मार्गावरील प्रमुख गावांपैकी एक असल्याने तिथला गड करवीरकरांनी ओसाड ठेवला असण्याची शक्यता आहे. त्यांनी पुन्हा दुरुस्ती केली असणार कारण १८६२ मध्ये देखील तटबंदी व खंदक बऱ्या स्थितीत होता.
सन १८६२ मधील पाहणीनुसार पाव कोस विस्ताराच्या नांदोस कोटाच्या सभोवार खंदक होता आणि तटबंदीची स्थिती देखील वाईट नव्हती. पाणी व इतर साहित्याचा पुरवठा चांगला होता. आज नांदोस किल्याच्या काहीच खाणाखुणा अस्तित्वात नाहीत आणि महत्त्वाचे म्हणजे इथे पूर्वी किल्ला होता हेच गावकऱ्यांना माहीत नाही.
इ.स. १८०५ मध्ये वाडी संस्थानात झालेल्या वारसाहक्काच्या अंतर्गत भांडणाचा फायदा घेऊन करवीर सैन्याने वाडी संस्थान घेण्याचे ठरवले. त्यासाठी करवीर सैन्याने नांदोस येथे तळ दिला व तेथे गढीवजा किल्ला बांधला. वाडीचे सरदार धोंडो गोविंद सावंत येथे झालेल्या लढाईत करवीरकरांकडून मारले गेले. त्यानंतर वाडीचे सरदार रामचंद्र खानविलकर व चंद्रोबा सुभेदार यांनी केलेल्या हल्ल्यात करवीरकरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व त्यांना आपले येथील बस्तान उठवावे लागले. यावेळी सावंतवाडीकरांनी हा किल्ला पाडून टाकला. इ.स. १८६२ मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या किल्ल्याच्या पाहणीत नांदोस येथील गढी सुस्थितीत असल्याची नोंद आहे. अश्या स्वरूपात माहिती संकलन विजय निकम यांनी केले आहे.

Subscribe to my channel




