दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर सोडणाऱ्या सहा वाहनधारकांवर कारवाई; ९ हजार ५०० रुपयांचा दंड
देवगड :मासळी वाहतुकीच्या नावाखाली रस्त्यावर दुर्गंधीयुक्त आणि दूषित पाणी सोडणाऱ्या वाहनचालकांना देवगड पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. विठ्ठलवाडी परिसरात रस्त्यावर अस्वच्छता पसरविणे तसेच विनापरवाना वाहन चालविणे अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा वाहनधारकांवर पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली. या कारवाईत एकूण ९ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
देवगड-विठ्ठलवाडी परिसरातून दररोज मोठ्या प्रमाणात मासळी वाहतूक करणारी वाहने ये-जा करतात. मासळी ताजी ठेवण्यासाठी वाहनांमध्ये बर्फाचा वापर केला जातो. मात्र, हा बर्फ वितळल्यानंतर तयार होणारे दुर्गंधीयुक्त पाणी काही वाहनचालकांकडून थेट रस्त्यावर सोडले जात असल्याने परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण होत होते. विशेष म्हणजे, रस्त्यावर साचणाऱ्या या पाण्यामुळे दुचाकी घसरून अपघात होण्याचा धोकाही वाढला होता. यापूर्वी अशा घटनांमध्ये नागरिकांना दुखापत झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
या गंभीर समस्येबाबत स्थानिक ग्रामस्थांनी देवगड तहसीलदार, पोलीस निरीक्षक आणि मत्स्य व्यवसाय विभागाकडे तक्रारी करून कारवाईची मागणी केली होती. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या देवगड परिसरात अशा प्रकारे रस्त्यावर दूषित पाणी सोडले जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा आणि सार्वजनिक स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेत मत्स्य व्यवसाय विभागाचे परवाना अधिकारी किरण वाघमारे यांनीही मासळी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना आवश्यक मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला होता.
दरम्यान, गुरुवारी देवगड पोलिसांनी विशेष तपासणी मोहीम राबवत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सहा वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई पोलीस निरीक्षक शाम बुवा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप खाडे आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सावंत यांनी केली.
यापुढेही अशा वाहनांची तपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार असल्याचे देवगड पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून, रस्त्यावर दुर्गंधीयुक्त पाणी सोडणाऱ्या वाहनचालकांना आता चाप बसेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





Subscribe to my channel




