
पाण्याचा प्रत्येक थेंब अडवा, जिरवा अन् वाचवा; ग्रामपंचायती, नागरिक आणि स्थानिक संस्थांनी एकत्रित पुढाकार घ्यावा – पालकमंत्री नितेश राणे
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी काळातील पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी आतापासूनच जलसंधारण आणि पाणी बचतीची ठोस कामे हाती घेण्याची गरज आहे. उपलब्ध पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते अडवणे, जमिनीत मुरवणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे ही काळाची गरज आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायती, शासकीय यंत्रणा, स्थानिक संस्था आणि नागरिकांनी एकत्र येत लोकसहभागातून जलसंधारणाची व्यापक चळवळ उभी करावी, असे आवाहन मत्स्यव्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि नागरिकांना लेखी पत्राद्वारे जलसंधारणाबाबत आवाहन केले आहे. पाणी ही प्रत्येकाची मूलभूत गरज असून पाण्याचा प्रत्येक थेंब वाचविणे ही सामूहिक जबाबदारी आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. लोकसहभागातून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेऊन स्थानिक पातळीवर उपलब्ध मनुष्यबळ आणि साधनसामग्रीचा प्रभावी वापर करावा. पाणी अडविणे, जमिनीत मुरविणे आणि भूजलपातळी वाढविण्यासाठी आवश्यक कामांना प्राधान्य द्यावे. त्याचबरोबर पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत गावागावात व्यापक जनजागृती करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
गावागावात वनराई बंधाऱ्यांना प्राधान्य
गावागावात वनराई बंधारे उभारण्याबरोबरच स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि उपलब्ध जागेचा विचार करून पावसाचे पाणी अडविण्यासाठी विविध जलसंधारणाची कामे हाती घ्यावीत. VB-G RAM G योजनेंतर्गत जलसंधारणाशी संबंधित पात्र कामांची तातडीने निवड करून प्रत्यक्ष कामांना गती द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. या कामांच्या माध्यमातून जलसंधारणासोबतच सामान्य नागरिकांच्या उत्पन्नवाढीवरही लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
‘पाणी बचत’ गावागावातील लोकचळवळ बनवा
प्रत्येक गावाने ‘पाणी बचत व जलसंधारण’ हा केवळ शासकीय योजनांचा विषय न ठेवता सामूहिक आणि वैयक्तिक जबाबदारीचा विषय म्हणून स्वीकारावा. लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करून गावपातळीवर जनजागृती करावी आणि व्यापक लोकचळवळ उभी करावी. उपलब्ध शासकीय योजनांचा लोकसहभागाशी योग्य समन्वय साधून सिंधुदुर्ग जिल्ह्यात जलसंधारणाची व्यापक चळवळ उभारण्याचे आवाहनही पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.
प्रशासकीय यंत्रणांनी नियमित आढावा घ्यावा
संबंधित प्रशासकीय विभागांनी आपल्या कार्यक्षेत्रातील जलसंधारणाच्या कामांचा नियमित आढावा घ्यावा, आवश्यक तांत्रिक मार्गदर्शन उपलब्ध करून द्यावे आणि कामे पूर्ण झाल्यानंतर त्यांची योग्य कार्यवाही सुनिश्चित करावी, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. सध्याची परिस्थिती लक्षात घेता पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते अडवणे, जिरवणे आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे अत्यावश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व घटकांनी एकत्रित पुढाकार घेत जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत, असे आवाहन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले आहे.







Subscribe to my channel






