जिल्ह्याची अर्थव्यवस्था बळकटीकरणात महिला बचत गटांचाही खारीचा वाटा

अतुल काळसेकर यांचे प्रतिपादन ; सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्डच्या वतीने आंगणेवाडीत बचत गटांच्या उत्पादीत मालाच्या प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा शुभारंभ

मालवण | कुणाल मांजरेकर

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बचत गट चळवळ कार्यरत असून जिल्हा बँक व नाबार्ड च्या माध्यमातून मागील दहा ते बारा वर्षांपासून या बचत गटांना उभारी देण्याचे काम सुरु आहे. आज जिल्ह्यात १५ हजार पेक्षा जास्त महिला बचत गट अस्तित्वात असून सुमारे ८० कोटी रुपये रक्कम या बचत गटांच्या खात्यात आहे. भविष्यातलं राजकारण महिला बचत गटांचं असणार असून उद्या गावचा लोकप्रतिनिधी कोण असावा, हे महिला बचत गट ठरवणार आहेत. आंगणे वाडी सारख्या जत्रेत ७० % नफा जिल्ह्याबाहेरील व्यापारी घेऊन जातात, अशावेळी जिल्हा बँकेमार्फत उभारलेल्या स्टेॉल मधून मागील वर्षी ५० ते ६० लाखांचे उत्पन्न या महिला बचत गटांनी मिळवले. त्यामुळे जिल्ह्याची अर्थव्यवस्था बळकटीकरणात या महिला बचत गटांचाही खारीचा अतुल आहे, असे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी आंगणेवाडीत बोलताना केले.

आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी जत्रोत्सवाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्हा बँक व नाबार्ड यांच्या संयुक्त विद्यमाने आंगणेवाडी येथे बचत गटांच्या उत्पादीत मालाचे प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी सायंकाळी श्री देवी भराडी मंदिर नजिक आंगणेवाडी येथे करण्यात आला.

यावेळी बँकेचे संचालक व्हीक्टर डान्टस, जिल्हा प्रबंधक नाबार्ड श्रीम.दिपाली माळी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बाळ परब, नितीन काळे जिल्हा समन्वयक अधिकारी (मावीम), वैभव पवार व्यवस्थापक जिल्हा अभियान व्यवस्थापक (उमेद) जिल्हा बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे, नगरसेवक विकी तोरसकर, नगरसेविका शर्वरी पाटकर, संदीप गावडे यांच्यासह जिल्हा बँक अधिकारी, शाखाधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

प्रास्ताविक प्रमोद गावडे यांनी केले. या प्रदर्शनात ११० बचत गट सहभागी झाले असून त्यात जिल्ह्याबाहेरील ४ बचत गटांचा समावेश आहे, असे ते म्हणाले. तर नाबार्ड च्या अधिकारी दीपाली माळी यांनी नाबार्डच्या महिला बचत गटांसाठीच्या उपक्रमांची माहिती दिली.

जिल्हा बँकेचे संचालक व्हिक्टर डॉन्टस यांनी जिल्हा बँके मार्फत अनेक उपक्रम राबवले जात असल्याचे सांगून त्यातील महत्वाचा उपक्रम म्हणजे महिला बचत गट सक्षमीकरण आहे. महिला बचत गट उत्पादन करतात. पण त्यांना विक्रीसाठी प्लॅटफॉर्म मिळत नाही, त्यासाठी जिल्हा बँक व नाबार्ड त्यांना मोठ्या शहरात विक्री व्यवस्था देत असल्याचे सांगून भविष्यात मुंबई, दिल्ली यासारख्या ठिकाणी देखील ही व्यवस्था दिली जाईल, असे ते म्हणाले. सुत्रसंचालन शरद सावंत यांनी करून आभार मानले. सदर बचत गटांच्या उत्पादित मालाचे प्रदर्शन व विक्री १० फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे.

error: Content is protected !!