

सहदेव बापर्डेकर यांचा “स्पॉट पंचनामा” ; पालिकाप्रशासनाच्या विरोधात स्वतः उपोषणाला बसण्याचा इशारा
मालवण : मालवण शहरात नगरपालिकेच्या वतीने सुरु असलेल्या गटार बांधणी कामाची दस्तूरखुद्द पालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनीच “पोलखोल” करत एकच खळबळ उडवून दिली आहे. शहरात आमदार निलेश राणे, खासदार नारायण राणे आणि पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचा निधी विकास कामांसाठी येत असताना आलेल्या विकास कामांचा योग्यरीतीने वापर व्हावा या उद्देशाने बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी शहरात सुरु असलेल्या कामांवर करडी नजर ठेवली असून आज मालवण शहरातील डॉ. रेडकर हॉस्पिटल ते पेट्रोल पंप या दरम्यानच्या सुरु असलेल्या गटार बांधकामाच्या कामाची सहदेव बापर्डेकर यांनी पाहणी करत काम निकृष्ट पद्धतीने चालल्याचा आरोप केला. यावेळी बापर्डेकर यांनी संबंधित ठेकेदारालाही खडेबोल सुनावले. या कामात वेळीच सुधारणा न केल्यास नगरपालिका प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला कामाच्या बिलाची रक्कम अदा करू नये, तसे न केल्यास प्रशासनाच्या विरोधात स्वतः उपोषणाला बसू असा इशारा बापर्डेकर यांनी दिला आहे.
मालवण शहरातील रेडकर हॉस्पिटल ते पेट्रोल पंप या दरम्यान सुरु असलेल्या सुमारे २५ लाख रुपये खर्चाच्या गटार बांधणीच्या कामाबाबत नागरिकांकडून तक्रारी आल्यानंतर नगरपालिकेचे बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण, भाजपा नगरसेवक ललित चव्हाण यांच्या समवेत पाहणी केली. यावेळी नगरपालिका बांधकाम विभागाचे अधिकारी श्री. केरीपाळे आणि संबंधित ठेकेदार उपस्थित होते. या पाहणी दरम्यान श्री. बापर्डेकर यांनी सुरु असलेल्या गटार बांधणी कामाची पोलखोल करीत काम नित्कृष्ट दर्जाचे होत असल्याचा गंभीर आरोप केला. यावेळी अधिकारी श्री. केरीपाळे यांनाही सुरु असलेल्या कामाबाबत विचारणा करीत कामातील त्रुटी निदर्शनास आणल्या.
या पाहणी दरम्यान गटाराचे आरसीसी बांधकाम योग्य पद्धतीने झाले नसल्याचे तसेच त्यामध्ये अनेक ठिकाणी खडी व सिमेंट व्यवस्थितरित्या भरले न गेल्याचे, काही ठिकाणी खड्डेमय भाग राहिल्याचे तसेच काही ठिकाणी राहिलेल्या मोकळ्या भागातून सळ्या दिसत असल्याचे बापर्डेकर यांनी सांगत काँक्रीट भरताना व्हायब्रेटिंग योग्य पद्धतीने केलेले नाही, किंवा त्यासाठी व्हायब्रेटर मशीन वापरली नसल्याने अनेक ठिकाणी पोकळ्या निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच गटाराच्या वरील भागात काही ठिकाणी खडी पडून असल्याचेही त्यांनी सांगितले.
शहरातील गटार बांधणीची कामे योग्य पद्धतीने व दर्जेदार झाली पाहिजेत अशा सूचना आपण प्रशासनाला व ठेकेदारांना देऊन देखील दर्जाहीन पद्धतीने कामे होत आहेत. अशा नित्कृष्ट दर्जाच्या कामांची बिले अदा करण्यात येऊ नये. जनतेचा पैसा आम्ही वाया जाऊ देणार नाही. नगरपालिका प्रशासनाने कामे दर्जेदार पद्धतीने न केल्यास आपण प्रशासनाच्या विरोधात उपोषण करू, असा इशारा यावेळी बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांनी यावेळी दिला.



Subscribe to my channel




