स्थानिक गणेशमूर्तिकारांना मिळणार संघटित बळ; ‘जय गणेश’ सेवा सहकारी संस्थेची स्थापना!

समीर वर्दम यांची अध्यक्षपदी निवड ; स्थानिक मातीच्या गणेशमूर्तींना ‘सिंधुदुर्ग ब्रँड’ म्हणून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचा निर्धार

मालवण : गणेशमूर्ती निर्मितीच्या पारंपरिक कलेचे जतन, संवर्धन आणि स्थानिक मूर्तिकारांना व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने मालवण तालुक्यातील मूर्तिकार व कारागीर बांधवांनी एकत्र येत ‘जय गणेश मूर्तिकार कारागीर सेवा सहकारी संस्था मर्यादित, मालवण’ या संस्थेची स्थापना केली आहे. मूर्तिकारांना संघटित व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच त्यांच्या व्यावसायिक, आर्थिक आणि विविध समस्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ही संस्था कार्यरत राहणार आहे.

संस्थेच्या स्थापनेची आणि आगामी उपक्रमांची माहिती देण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी हॉटेल विसावा येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. संस्थेच्या अध्यक्षपदी समीर वर्दम, उपाध्यक्षपदी उमेश हडकर, सचिवपदी संजय केळुसकर, तर खजिनदारपदी नारायण माडये यांची निवड करण्यात आली आहे. सदस्य म्हणून हेमंत रागडे, सुनील केळुसकर, सुशांत तावशेळे, बाबुराव चव्हाण, सुधीर पवार, हर्षद पाडीगावकर, पंढरीनाथ नाथणकर, रविंद्र साळकर, सरिता पेंडणेकर, जगन्नाथ कोयंडे, शरद गावडे, आप्पाजी चव्हाण, प्रकाश रेवडेकर, प्रकाश पवार, संदीप गावडे आणि संदीप कोळगे यांचा समावेश आहे.

गणेशमूर्ती निर्मिती ही केवळ व्यवसायाची बाब नसून कोकणच्या सांस्कृतिक परंपरेचा आणि पारंपरिक हस्तकलेचा महत्त्वाचा वारसा आहे. या कलेचे जतन करण्याबरोबरच मूर्तिकारांना आर्थिक व व्यावसायिक सहकार्य मिळवून देणे, त्यांच्या समस्यांना शासनदरबारी वाचा फोडणे आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी संस्था प्रयत्नशील राहणार आहे. तसेच स्थानिक मूर्तिकारांच्या कलाकृतींना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचाही संस्थेचा मानस आहे.

स्थानिक मूर्तिकारांच्या पाठीशी उभे राहा!

पत्रकार परिषदेत पदाधिकाऱ्यांनी स्थानिक मूर्तिकारांच्या हिताची भूमिका स्पष्ट केली. “आमचा पीओपी गणेशमूर्तींना विरोध नाही; मात्र स्थानिक पारंपरिक मूर्तिकार आणि कारागिरांच्या कलेलाही योग्य प्रोत्साहन मिळाले पाहिजे. त्यांच्या हाताला काम, कलेला बाजारपेठ आणि मेहनतीला योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. स्थानिक मूर्तिकार जगले तरच पारंपरिक गणेशमूर्ती कलेचा वारसा टिकेल,” असे आवाहन करण्यात आले.

स्थानिक कलाकारांना वर्षभर रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्या मूर्तींना जिल्ह्याबाहेरही मागणी निर्माण व्हावी आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कलाकृती पोहोचाव्यात, यासाठी संस्था विशेष प्रयत्न करणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

मातीच्या गणेशमूर्ती हाच ‘सिंधुदुर्ग ब्रँड’ बनविण्याचा संकल्प!

“पर्यावरणपूरक मातीच्या गणेशमूर्ती हीच सिंधुदुर्गची खरी ओळख आणि अभिमान बनली पाहिजे. स्थानिक मूर्तिकारांनी घडविलेल्या मातीच्या गणेशमूर्तींना प्राधान्य देऊन ‘सिंधुदुर्ग ब्रँड’ राज्यभर पोहोचविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. मातीच्या मूर्तींचा सन्मान आणि स्थानिक कलेचा अभिमान हीच आमची भूमिका आहे,” असे पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

मातीच्या मूर्ती घडविणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देतानाच त्यांच्या कलाकृतींना योग्य किंमत आणि आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत मूर्तिकार हा केंद्रस्थानी राहणार असून त्याची प्रगती आणि एकजूट हेच संस्थेचे प्रमुख ध्येय असेल.

१० नोव्हेंबरला मालवणमध्ये भव्य गणेशमूर्ती प्रदर्शन!

संस्थेच्या स्थापनेनंतरचा पहिला उपक्रम म्हणून मंगळवार, १० नोव्हेंबर रोजी मालवण येथे भव्य गणेशमूर्ती प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. भरड येथील श्री दत्त मंदिरात सकाळी १० ते रात्री ११.३० वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. या प्रदर्शनात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६५ हून अधिक युवा आणि नामांकित मूर्तिकार सहभागी होणार असून त्यांच्या कल्पकतेतून आणि कलाकौशल्यातून साकारलेल्या विविध आकर्षक गणेशमूर्ती पाहण्याची संधी गणेशभक्तांना मिळणार आहे. विशेषतः ‘सिंधुगणेश’ आणि ‘उड्या मूर्ती’ हे या प्रदर्शनाचे विशेष आकर्षण ठरणार आहे.

जिल्ह्यातील मूर्तिकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणे, त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देणे आणि मूर्तिकलेच्या माध्यमातून सिंधुदुर्गची स्वतंत्र ओळख निर्माण करणे हा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी ज्येष्ठ मूर्तिकार आणि उपस्थित मान्यवरांच्या माध्यमातून विशेष उल्लेखनीय मूर्तींची निवड करून पहिल्या पाच मूर्तिकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे नवोदित आणि अनुभवी कलाकारांना एकाच व्यासपीठावर आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला गणेशोत्सवाची समृद्ध परंपरा लाभली असून येथील मूर्तिकार पिढ्यान्‌पिढ्या आपल्या कलाकौशल्यातून गणेशमूर्ती घडवत आहेत. या पारंपरिक कलेला संघटित बळ देण्याच्या दिशेने संस्थेने टाकलेले हे पहिले पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.या भव्य प्रदर्शनाला मालवणसह संपूर्ण जिल्ह्यातील गणेशभक्त, कलाप्रेमी, नागरिक आणि मूर्तिकार बांधवांनी सहकुटुंब उपस्थित राहून स्थानिक कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन ‘जय गणेश मूर्तिकार कारागीर सेवा सहकारी संस्था मर्यादित, मालवण’ यांच्यावतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!