उद्धवजी, तुमचे लोकप्रतिनिधी काय करतात याची गुप्त माहिती घ्या ; राणेंचा सल्ला
कितीही नाकारलं तरी सिंधुदुर्गच्या विकासासाठीचं एकच नाव ते म्हणजे नारायण राणे
विमानतळाच्या उदघाटन सोहळ्यात राणेंकडून राजकिय फटकेबाजी
कुणाल मांजरेकर
चिपी विमानतळाच्या लोकार्पण सोहळ्याच्या व्यासपीठावरून भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार राजकीय फटकेबाजी केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या खासदार विनायक राऊत यांच्यावर टीका करताना याला प्रोटोकॉल म्हणतात का ? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. उद्धव ठाकरे साहेब तुम्हाला जी माहिती मिळते ती खरी नाही, तुमचे लोकप्रतिनिधी याठिकाणी काय करतात, याची तुम्ही गुप्त माहिती घ्या, असा सल्ला राणेंनी दिला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला सिंधुदूर्गात पाठवलं, त्यावेळी या जिल्ह्याची परिस्थिती अतिशय बिकट होती. यानंतर मागील पंचवीस वर्षांच्या काळात जिल्ह्याचा सर्वांगीण विकास झाला. हा विकास कोणी केला, याची माहिती येथील जनतेला आहे. कोणी कितीही नाकारलं तरी या विकासासाठी एकच नाव पुढे येईल ते म्हणजे नारायण राणे असंही राणेंनी यावेळी बोलताना सांगितलं.
चिपी विमानतळाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आलं. यावेळी व्यासपीठावरून बोलताना नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा १९९० पासून आजपर्यंतचा प्रवास उलगडून दाखवताना अलीकडे जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कमतरता निर्माण होत असल्याकडे लक्ष वेधले. विमानतळाचं आज उद्घाटन होत आहे, हा माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे. १९९० मध्ये मी सिंधुदुर्गात आलो, त्यावेळी रस्ते नव्हते, पाणी नव्हतं, शाळांना वर्ग खोल्याही नव्हत्या. पण त्यानंतर आजपर्यंतच्या काळात सिंधुदुर्गात या सर्व गोष्टी निर्माण झाल्या आहेत. ही कामं कोणी केली ते येथील लोकांना ज्ञात आहे. मी सत्तेत असताना जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला. सिंधुदुर्गचा जो आज विकास झाला आहे, त्यासाठी एकमेव नाव म्हणजे नारायण राणे ! दुसरं नाव यासाठी होऊ शकत नाही हे येथील जनता जाणते, असं नारायण राणे म्हणाले.
राणेंनी दाखवलं विमानतळाला विरोध करणाऱ्यांचे कात्रण
नारायण राणे यांनी आपल्या भाषणात विमानतळाच्या भूमिपूजन प्रसंगी विरोध करणाऱ्यांचे वृत्तपत्रातील कात्रण बाहेर काढलं. १५ ऑगस्ट २००९ रोजी मी आणि सुरेश प्रभू विमानतळाचे भूमिपूजन करण्यासाठी आलो होतो. यावेळी काही जण या विमानतळाला विरोध करत होते. आम्हाला विमानतळ नको असं त्यांनी सांगून हे काम अडवण्याचा प्रयत्न केला. यातील काही मंडळी आज या व्यासपीठावर उपस्थित आहेत. सिंधुदुर्गात हायवेच्या चौपदरीकरणाचे काम बहुतांशी पूर्ण झाले आहे. हे काम देखील काहींनी अडवून अगोदर आमचं भागवा, असं सांगितलं. या व्यक्ती कोण आहेत ते उद्धवजी तुमच्या सहकाऱ्यांना विचारा, असं राणेंनी सांगितलं. सिंधुदुर्गातील सी वर्ल्ड प्रकल्पाला ही याच लोकांनी विरोध केला. तुम्ही समजता तसं इथे नाही, याठिकाणी परिस्थिती अतिशय वेगळी आहे, असं सांगून राणेंनी शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. आदित्य ठाकरे तरुण आहेत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी टाटा कन्सल्टन्सीने तयार केलेला अहवाल वाचावा, त्याचा अभ्यास करावा आणि जिल्ह्यासाठी पैसे उपलब्ध करून द्यावेत. अलीकडच्या काळात येथील धरणांना एक रुपयाही मिळाला नाही, मी केलेल्या कामानंतर धरणाचं १ टक्का काम देखील पुढे गेलेलं नाही. आज विमानतळ सुरु होत आहे, मात्र या विमानतळाला रस्ता नाही, वीज नाही आणि पाणीही नाही. या विमानतळावर दाखल होणाऱ्या पर्यटकांनी येथील खड्डे पाहावेत का ? या रस्त्यासाठी ३४ कोटी निधीची आवश्यकता आहे. हा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी नारायण राणे यांनी केली.
सिंधुदुर्गात विमानतळ पूर्ण झालं आहे. या विमानतळाचा परिसर सुशोभित करण्याची आवश्यकता आहे. याकडे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी लक्ष घालावं.. याठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यासाठी मी अतिरिक्त जागा घेतली आहे. तसंच बाहेरील विमानांचं पार्किंग येथे व्हावं, यासाठी जागेची तरतूद केली आहे. ९३४ हेक्टर जागा विमानतळासाठी संपादित करण्यात आली आहे, असं सांगून येथील स्थानिक लोकांना रोजगार मिळावा, अशी मागणी नारायण राणे यांनी केली आहे.
“एमएसएमई” मार्फत राज्यात उद्योगधंदे वाढीसाठी प्रयत्न
केंद्रातील लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्रालय माझ्याकडे आहे. या मंत्रालयाच्या अंतर्गत ८० % उद्योग येतात. या खात्यामार्फत राज्यात उद्योग वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे नारायण राणे म्हणाले. पुढील ८ ते १० दिवसांत एमएसएमई चे अधिकारी सिंधुदुर्गात येणार आहेत. त्यांना राज्याच्या एमआयडिसी विभागाचे सहकार्य आवश्यक असल्याचे राणे म्हणाले.