भातशेती करपली; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आमदार निलेश राणे मैदानात

तळगाव, चौके, कुंभारमाठ परिसराची प्रत्यक्ष पाहणी; नुकसानग्रस्त भातशेतीचे सरसकट पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

मालवण : पावसाने ओढ दिल्याने आणि बदलत्या हवामानाचा फटका बसल्याने मालवण तालुक्यातील भातशेती मोठ्या संकटात सापडली आहे. भाताचे पीक हातातोंडाशी आले असतानाच अनेक ठिकाणी पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेत आमदार निलेश राणे यांनी मंगळवारी थेट शेताच्या बांधावर पोहोचत तळगाव, चौके आणि कुंभारमाठ परिसरातील नुकसानग्रस्त भातशेतीची पाहणी केली.

आमदार राणे यांनी यावेळी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून नुकसानीची परिस्थिती जाणून घेतली. नुकसानग्रस्त भातशेतीचे सरसकट आणि तातडीने पंचनामे करा, असे स्पष्ट निर्देश त्यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिले. पंचनाम्याची प्रक्रिया केवळ कागदोपत्री न राहता ती जलदगतीने पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई लवकर मिळण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे यंदाच्या भात उत्पादनावर परिणाम झाला असून, अनेक शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. त्यामुळे नुकसानीचे अचूक पंचनामे होऊन शासनाच्या मदतीचा लाभ वेळेत मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी यावेळी व्यक्त केली.

या पाहणीदरम्यान तहसीलदार गणेश लव्हे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, पंचायत समिती गटविकास अधिकारी जाधव, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर, जिल्हा परिषद सदस्या अक्षता गावडे, मालवण सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती श्याम झाड, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांच्यासह विविध पदाधिकारी, अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!