मनसेची पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी ; आठवड्यातून २ दिवसच मुख्याधिकारी उपलब्ध होत असल्यामुळे नागरिकांची गैरसोय
मालवण : मालवण नगरपरिषदेची सत्ता येऊन ८ महिन्यांचा कालावधी उलटला तरी देखील मालवण नगरपालिकेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळालेला नाही. तरी याठिकाणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळावा अशी मागणी मनसेच्या वतीने पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
याबाबत मनसे मालवण तालुका अध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन, उपजिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर व शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांना निवेदन देण्यात आले. हे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक यांनी स्वीकारले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, सध्या मालवण नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त पदभार असलेले अधिकारी हे आठवड्यातून केवळ २ दिवसच मालवणमध्ये उपलब्ध होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. दाखले, परवाने आणि इतर दैनंदिन कामांसाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत. ही गैरसोय तात्काळ दूर करण्यासाठी एकतर सध्या पदभार असलेल्या अधिकाऱ्यांनाच कायमस्वरूपी पदभार देण्यात यावा, अन्यथा तातडीने कायमस्वरूपी मुख्याधिकारी पद भरण्यात यावे, अशी मागणी मनसेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.