ग्रामीण रुग्णालयाचे चार लाख वीज बिल थकित ; वीज पुरवठा खंडित करण्याचा इशारा
शासकीय कार्यालयांनी तात्काळ बिले भरण्याचे विज वितरण कंपनीचे आवाहन
वैभववाडी : वीज वितरण कंपनीने विज बिल वसुलीची धडक मोहीम सुरू केली आहे. वैभववाडी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयाचे तब्बल ४ लाख इतके वीज बिल थकीत आहे. सदर वीज बिल भरणा तात्काळ न केल्यास वीज पुरवठा कोणत्याही क्षणी खंडित करणार असा इशारा वीज वितरण कंपनीकडून देण्यात आला आहे. तसेच तालुक्यातील बहुतांश शासकीय कार्यालये, प्राथमिक व माध्यमिक शाळा, ग्रामपंचायत पाणी पुरवठा योजना, आदींची देखील विज बिलं मोठ्या प्रमाणात थकित आहेत. त्यांनीही तात्काळ वीज बिले भरावीत असे आवाहन वीज वितरण अधिकारी यांच्याकडून करण्यात आले आहे.
वैभववाडी वीज वितरण उपविभागीय कार्यालय अख्त्यारित पाच सेक्शन आहेत. त्यामध्ये वैभववाडी १, वैभववाडी २, भुईबावडा, तरेळे व खारेपाटण या सेक्शनचा समावेश आहे. या सेक्शन मधील अनेक कार्यालयांचा थकित वीज बिलांचा आकडा लाखो रुपये इतका आहे. मार्च एडींगमुळे वीज वितरण कंपनी ॲक्शन मोडमध्ये उतरली आहे. वारंवार संपर्क साधून देखील संबंधित कार्यालये वीज बिले भरणाकडे दुर्लक्ष करत आहेत. सदर वीज बिले तात्काळ भरणा करावीत, अन्यथा संबंधित कार्यालयांचा वीज पुरवठा खंडित केला जाईल असा इशारा कंपनीकडून देण्यात आला आहे.