जन आशीर्वाद यात्रेत आडवली- मालडी विभागाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन !
दत्ता सामंत, सुनील घाडीगांवकर यांच्या नेतृत्वाखाली मोटरसायकल, गाड्यांचा ताफा
२०० पेक्षा जास्त वाहनांमुळे आचऱ्यात आडवली विभागाच्या रॅलीचीच चर्चा
कुणाल मांजरेकर
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा तब्बल सात वर्षांनी राजकीय विजनवास संपून केंद्रातील मोदींच्या मंत्रिमंडळात सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग विभागाचे कॅबिनेटमंत्री म्हणून त्यांची वर्णी लागली आहे. सुरेश प्रभू यांच्या नंतर नारायण राणेंच्या मंत्रिमंडळ समावेशामुळे मूळ भाजप कार्यकर्त्यांसह राणे समर्थकांच्या गोटात प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. याचा प्रत्यय शुक्रवारी आचरा येथील जन आशीर्वाद यात्रेत भाजप कार्यकर्त्यांच्या गोटात पाहायला मिळाला. आडवली- मालडी जि. प. विभागातून भाजप नेते दत्ता सामंत आणि माजी सभापती तथा पं. स. गटनेते सुनील घाडीगांवकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो वाहने रॅलीने आचऱ्यात दाखल झाली. यावेळी प्रत्येकाच्या तोंडावर उत्साह पाहायला मिळाला. दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली सुनील घाडीगावकर यांनी या रॅलीचे चोख नियोजन केल्याने आचऱ्यात सभास्थळी आडवली- मालडी विभागाच्या या रॅलीचीच चर्चा सुरू होती.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शुक्रवारी सायंकाळी मालवण तालुक्यात दाखल झाली. तालुक्याच्या प्रवेशद्वारावर आचरा येथे राणेंचे भव्य स्वागत करण्यात आले. आडवली- मालडी जि. प. विभागाच्या वतीने याठिकाणी ना. राणेंचे स्वागत करण्यात आले. विभागातून २०० ते २५० वाहनांचा ताफा याठिकाणी दाखल झाला होता. त्यामुळे आडवली ते आचरा मार्गात दत्ता सामंत आणि सुनील घाडीगांवकर यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या या रॅलीची एकच चर्चा सुरू होती. दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली चोख नियोजन करून ही रॅली काढण्यात आली. विभागातील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि भाजपचे कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते.
आडवली- मालडी विभागातून निघालेली नेत्रदीपक रॅली