आपत्ती काळात अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करा ; मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री २४ तास असणार उपलब्ध : ना. एकनाथ शिंदे यांची ग्वाही

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुक्रवारी राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्यासह विविध विभागांचे सचिव तसेच हवामान, रेल्वे, बेस्ट, पालिका, लष्कर, जेएनपीटी आदी संस्थांच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

सर्व यंत्रणांनी आपापसात योग्य समन्वय ठेऊन कोणत्याही परिस्थितीत आपत्तींमध्ये जीवितहानी होणार नाही हे बघावे. त्याचप्रमाणे संपर्क-संवाद ठेवतानाच अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष फिल्डवर उतरून काम करावे,त्यामुळे यंत्रणेतील सर्व लोकही सतर्क राहतील,असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी व पालिका कार्यालयांमधील वॉररुम यंत्रणा सज्ज ठेवून लोकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा. नेहमी दरड कोसळणाऱ्या जागांव्यतिरिक्त इतर ठिकाणीही अधिक दक्ष राहण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना मोठ्या पावसावेळी तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवून त्या ठिकाणी त्यांच्या जेवणाखाण्याची व्यवस्था करण्याची जबाबदारी पालिकांनी घ्यावी. माझ्यासह उपमुख्यमंत्री २४ तास आपणा सर्वांसाठी उपलब्ध असतील, असेही ते म्हणाले.

एका दिवसात २७५ मि.मी. पाऊस पडूनही महानगरपालिका तसेच रेल्वेने सफाई तसेच पाणी तुंबणार नाही यासाठी केलेल्या व्यवस्थेमुळे कोठेही मुंबईकरांना त्रास झाला नाही. त्याचप्रमाणे वाहतूकही सुरळीत राहिली, याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान व्यक्त केले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!