सिंधुदुर्गात पुढील वर्षभरात सबमरीन पर्यटन ; ना. आदित्य ठाकरेंची घोषणा

कोकणात शाश्वत विकास करण्याचीही ग्वाही ; २५ वर्षे रखडलेली दोन्ही मोठी हॉटेल्स तीन वर्षात पूर्ण होणार

सिंधुदुर्ग (जिमाका) – पुढच्या एक वर्षात जिल्ह्यात सबमरीन पर्यटन आणू तसेच कोकणात शाश्वत विकास केला जाईल, असे आश्वासन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.
वेंगुर्ला येथील मधूसुदन कालेलकर सभागृहात झालेल्या कार्यक्रमात सिंधुरत्न समृद्ध योजनेचे लोकार्पण पर्यटन मंत्री ना. ठाकरे यांच्या हस्ते आज झाले. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, सिंधुरत्न समृद्ध योजनेचे अध्यक्ष आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, संजय पडते, संदेश पारकर, सतीश सावंत आदी उपस्थित होते. पर्यटन मंत्री ना. ठाकरे म्हणाले, आरमार इस्दाचे माॕडेल अॕक्वेटिक टुरिझम सिंधुदुर्गमुळे राज्यात सुरु झाले आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षात इतर राज्यातील पर्यटन राज्यात खेचण्यात आपण यशस्वी होणार आहोत. कोकणाला सुंदर समुद्र किनारा लाभला आहे. त्यामुळे शाश्वत विकास कसा करायचा यावर आपण लक्ष केंद्रीत केलं आहे. मुंबईच्या विकासात कोकणी माणसाचा सिंहाचा वाटा आहे. कोकणी माणसासाठी शाश्वत विकासाचे माॕडेल आपणाला राबवायचं आहे. गेली २५ वर्षे प्रलंबित असणारी दोन्ही मोठी हाॕटेल पुढील तीन वर्षात पूर्ण होतील. सिंधुरत्न योजनेला पुढील एक ते दीड वर्षात यश येईल. त्यासाठी आम्ही कोठेही कमी पडणार नाही, अशी ग्वाहीही त्यांनी शेवटी दिली.

पालकमंत्री उदय सामंत म्हणाले, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विमानतळ, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सिंधुरत्न योजनेची दिलेली तिन्ही आश्वासने पूर्ण केली आहेत. बॕ नाथ पै यांचे स्मारकही जिल्हा नियोजनमधून पूर्ण होत आहे. तर आमदार दीपक केसरकर म्हणाले, सिंधुरत्न योजनेचे एकमेव श्रेय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जाते. काजूचा टर्नओव्हर ६ हजार २०० कोटीचा आहे. तो ९ हजारपर्यंत नेवू शकतो. इथला बागायतदार आता आंतर पिकात हळद, मसाल्याची रोपे तयार करतोय. २० हजार हेक्टरवर दुबार पीक घेतोय. नवाबागमधून फिशिंग व्हिलेज सुरु करतोय. माणसाचं उत्पन्न दुप्पट करायचंय. या सर्वात पर्यटन हा सर्वांचा गाभा राहिला पाहिजे.

खासदार विनायक राऊत म्हणाले, पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याला अत्युच्च शिखरावर नेवून ठेवण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून होईल. सबमरीन पर्यटनाचा प्रकल्प अंमलात आणला जाणार असून या योजनेच्या माध्यमातून रत्नागिरीचा विकासही होणार असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्ज्वलनाने झाली. सुरुवातीला वायंगणी महोत्सव कासव जत्रा, सबमरीन प्रकल्प माहितीपट दाखविण्यात आला. तसेच सिंधुरत्न योजनेचे सादरीकरण झाले. अंकुर वस्तीस्तर संघ, स्त्रीशक्ती वस्तीस्तर संघ यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले. तर मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी आभार मानले.

Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!