विरोधकांच्या आरोपांची उपनगराध्यक्ष दीपक पाटकरांकडून पोलखोल!

मालवणच्या विकासात अडथळे आणणाऱ्यांना जशास तसे उत्तर देणार; उबाठा गटावर जोरदार निशाणा

नळपाणी योजनेसह सर्व विकासप्रकल्प दर्जेदार आणि गतिमान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध; आमदार निलेश राणेंच्या नेतृत्वाखाली विकासाला नवी दिशा

मालवण : मालवण शहरातील नव्या नळपाणी योजनेसह विविध विकासकामांवरून विरोधकांकडून करण्यात येणारे आरोप तथ्यहीन असून, केवळ राजकीय स्वार्थापोटी नागरिकांमध्ये संभ्रम आणि गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. नगरपरिषदेची बदनामी करून विकासकामांना खीळ घालण्याचे उबाठा गटाचे राजकारण यापुढे खपवून घेतले जाणार नाही. विरोधकांच्या प्रत्येक आरोपाला वस्तुस्थितीच्या आधारे जशास तसे उत्तर दिले जाईल, असा ठाम इशारा मालवण नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती दीपक पाटकर यांनी दिला आहे.

नव्या नळपाणी योजनेच्या कामावरून विरोधकांकडून सातत्याने आक्षेप घेतले जात आहेत. मात्र, योजनेचे काम प्रशासकीय वरिष्ठ स्तरावरील मान्यता आणि नियमानुसारच सुरू आहे. योजनेत वापरण्यात येणारे पाइप योग्य दर्जाचे असून, पाण्याच्या टाक्यांची उभारणीदेखील आवश्यक प्रशासकीय मंजुरीनंतरच करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणतीही ठोस माहिती न घेता योजनेबाबत आरोप करणे म्हणजे नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. केवळ कामात त्रुटी शोधणे आणि विकासकामांबाबत नकारात्मक वातावरण निर्माण करणे, हाच विरोधकांचा अजेंडा असल्याची टीका पाटकर यांनी केली.

मालवण शहराची नळपाणी योजना ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेली अत्यंत महत्त्वाची योजना आहे. शहरातील प्रत्येक नागरिकाला पुरेशा दाबाने आणि मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध व्हावे, हे नगरपरिषदेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे योजनेच्या कामाचा दर्जा, पारदर्शकता आणि नियोजन याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. नळपाणी योजनेसह शहरातील सर्व विकासप्रकल्प दर्जेदार आणि गतिमान पद्धतीने पूर्ण करण्यासाठी नगरपरिषद कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

आमदार निलेश राणेंच्या पाठपुराव्यामुळे विकासकामांना गती

आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मालवण शहराच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत आहे. पाणीपुरवठा, रस्ते, पायाभूत सुविधा तसेच नागरिकांच्या मूलभूत गरजांशी संबंधित विविध विकासकामे मार्गी लावण्यासाठी महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी एकजुटीने प्रयत्नशील आहेत. मालवण शहराचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास करणे, प्रलंबित प्रश्न सोडवणे आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे, हेच नगराध्यक्षा आणि सर्व नगरसेवकांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे पाटकर यांनी सांगितले.

विकासकामांबाबत विरोधकांनी विधायक टीका करावी, त्यातील त्रुटी निदर्शनास आणून द्याव्यात; मात्र कोणतीही ठोस माहिती न घेता आरोप करणे, नागरिकांमध्ये गैरसमज पसरवणे आणि नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत चुकीचे चित्र निर्माण करणे योग्य नाही. राजकीय आरोप-प्रत्यारोपांपेक्षा मालवण शहराचा विकास आणि नागरिकांचे हित अधिक महत्त्वाचे आहे. विरोधकांनी विकासकामांना सहकार्य करण्याऐवजी अडथळे निर्माण करण्याचे राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

विकासाची गती कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही!

मालवण शहराच्या विकासासाठी आम्ही सदैव कटिबद्ध आहोत. जनतेने आमच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवणे, शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे आणि विकासप्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करणे ही आमची जबाबदारी आहे. विरोधकांच्या आरोपांमुळे विकासकामांची गती मंदावणार नाही. नगरपरिषदेची बदनामी करून जनतेची दिशाभूल करणाऱ्या प्रत्येक प्रयत्नाला योग्य वेळी ठोस उत्तर दिले जाईल. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण शहराच्या विकासाला नवी दिशा देण्यासाठी शिवसेना महायुतीचे सर्व लोकप्रतिनिधी एकजुटीने कार्यरत राहतील, असा निर्धार उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांनी व्यक्त केला.

error: Content is protected !!