चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग प्रशासनाची ‘मेगा मॉक ड्रिल’

जिल्ह्यातील ७ ठिकाणी रंगीत तालीम; ७०६ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, ६४२ जवान व कर्मचाऱ्यांची तैनाती

सिंधुदुर्ग : चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीच्या काळात जीवित व वित्तहानी कमीत कमी करण्यासाठी प्रशासनाची पूर्वतयारी, विविध यंत्रणांमधील समन्वय आणि तातडीची प्रतिसादक्षमता अत्यंत महत्त्वाची आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या संयुक्त सहभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी, १ ऑक्टोबर रोजी विशेष बहुराज्यीय रंगीत तालीम (मॉक ड्रिल) घेण्यात आली. जिल्ह्यातील सात ठिकाणी झालेल्या या सरावात तब्बल ७०६ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले, तर बचाव व मदतकार्यासाठी सुमारे ६४२ मनुष्यबळ तैनात करण्यात आले.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अध्यक्षा तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली ही रंगीत तालीम पार पडली. वेंगुर्ला तालुक्यातील रेडी पोर्ट येथे विशेष संयुक्त मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आले होते. “चक्रीवादळाच्या काळात यंत्रणांची सज्जता अत्यंत महत्त्वाची असून, नागरिकांनीही प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आपत्ती व्यवस्थापनात सहकार्य करावे,” असे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी केले.

सात ठिकाणी प्रत्यक्ष सराव

मालवण तालुक्यातील तारकर्ली व आचरा, वेंगुर्ला तालुक्यातील रेडी पोर्ट, श्रीरामवाडी व शेर्ली, तसेच देवगड तालुक्यातील विजयदुर्ग व तांबळडेग येथे मॉक ड्रिल घेण्यात आली. या सरावामध्ये NDRF, SDRF, पोलीस, होमगार्ड, नागरी संरक्षण दल, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, स्वयंसेवी संस्था आणि आपदा मित्र यांनी सहभाग घेतला. आपत्कालीन संदेश मिळाल्यानंतर बचावकार्य, नागरिकांचे स्थलांतर, मदतकार्य आणि आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याची कार्यपद्धती प्रत्यक्ष तपासण्यात आली.

७०६ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर

रंगीत तालमीदरम्यान सातही ठिकाणांहून एकूण ७०६ नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले. यात तारकर्ली ७५, आचरा ७४, श्रीरामवाडी १५०, शेर्ली ७०, रेडी पोर्ट ५०, विजयदुर्ग १२०, तांबळडेग १६७ जणांचे स्थलांतरण करण्यात आले. स्थलांतरित नागरिकांमध्ये ३७५ पुरुष, २९५ महिला आणि ५३ बालकांचा समावेश होता.

६४२ मनुष्यबळाची तैनाती

बचाव व मदतकार्याच्या दृष्टीने सातही ठिकाणी विविध यंत्रणांचे मिळून सुमारे ६४२ मनुष्यबळ तैनात करण्यात आले. तारकर्ली येथे १५८, आचरा १०९, श्रीरामवाडी ७३, शेर्ली ६८, रेडी पोर्ट ६७, विजयदुर्ग ८० आणि तांबळडेग येथे ८७ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपत्कालीन प्रतिसाद कार्यात सहभाग घेतला.

समुद्रकिनाऱ्यामुळे सिंधुदुर्गासाठी विशेष दक्षता

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याला सुमारे १२० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असल्याने चक्रीवादळासारख्या आपत्तींच्या दृष्टीने जिल्ह्याने विशेष दक्ष राहणे आवश्यक आहे. यापूर्वीही जिल्ह्याने विविध नैसर्गिक आपत्तींचा सामना केला आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना, पूर्वतयारी आणि सर्व यंत्रणांमधील समन्वयाला प्राधान्य देणे गरजेचे आहे.

आपत्तीच्या काळात रस्ते, मोबाईल नेटवर्क आणि दळणवळण व्यवस्था विस्कळीत होण्याची शक्यता असते. त्यामुळे पर्यायी व्यवस्था किती प्रभावीपणे कार्यान्वित करता येते, मदत किती वेगाने पोहोचविता येते आणि विविध विभागांमध्ये समन्वय कसा साधला जातो, याची प्रत्यक्ष पडताळणी या मॉक ड्रिलमधून करण्यात आली.

सरावादरम्यान आढळलेल्या त्रुटी व उणिवांची नोंद घेऊन त्यावर सुधारणा केल्यास प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी अधिक प्रभावी प्रतिसाद देता येईल, असे जिल्हाधिकारी धोडमिसे यांनी स्पष्ट केले.

रेडी पोर्ट येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, श्रीरामवाडी येथे अप्पर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, शेर्ली येथे सावंतवाडीचे उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, आचरा येथे पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहीकर, तारकर्ली येथे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल पुंड, विजयदुर्ग येथे अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम आणि तांबळडेग येथे जगदीश काटकर यांच्या उपस्थितीत रंगीत तालीम पार पडली.

मुंबई मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या सहसचिव मुग्धा धुरी, आपत्ती व्यवस्थापन समन्वयक बालाजी व्हरकट, वित्तीय व्यवस्थापन सल्लागार सागर वळांजू आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजश्री सामंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!