
शर्वरी सावंत द्वितीय तर रिया वाघ तृतीय क्रमांकाच्या मानकरी ; विजेत्यांवर बक्षिसांची बरसात
मालवण : मालवणी संस्कृती, परंपरा आणि सांस्कृतिक वारसा जपतानाच महिलांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला महिलांसाठीचा नारळी पौर्णिमा उत्सव मालवण बंदर जेटी येथे मोठ्या उत्साहात पार पडला. शेकडो महिलांच्या उपस्थितीत रंगलेल्या नारळ लढविणे स्पर्धेने बंदर जेटीवर अक्षरशः उत्साहाचे वातावरण निर्माण केले.
महिलांच्या कलागुणांना आणि सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष अरविंद नामदेव मोंडकर यांच्या पुढाकारातून २०१६ पासून या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यंदा स्पर्धेचे अकरावे वर्ष होते. त्यामुळे यंदाच्या सोहळ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. गुरुवारी सायंकाळी व्यापारी संघाच्या वतीने समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर नारळ लढविणे स्पर्धेला प्रारंभ झाला. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती. मंडळाच्या वतीने सहभागी महिलांना नारळ मोफत उपलब्ध करून देण्यात आले. पारंपरिक मालवणी खेळाचा आनंद घेत महिलांनी उत्स्फूर्तपणे स्पर्धेत सहभाग नोंदविला.
अत्यंत चुरशीच्या झालेल्या स्पर्धेत स्वप्ना वासुदेव मणचेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावत बाजी मारली. त्यांना फ्रिज, पैठणी, सोन्याची नथ, १० लाखांचा विमा तसेच आर्या हेल्थ केअरच्या वतीने आयुर्वेदिक स्किन केअर किट देण्यात आले. शर्वरी शिवराज सावंत यांनी द्वितीय क्रमांक मिळविला. त्यांना मिक्सर, पैठणी, सोन्याची नथ, १० लाखांचा विमा आणि आयुर्वेदिक स्किन केअर किट देण्यात आले. रिया राजेंद्र वाघ यांनी तृतीय क्रमांक पटकावला. त्यांना कुकर, पैठणी, चांदीची पैंजण तसेच आयुर्वेदिक स्किन केअर किट देण्यात आले. तर अंजली चंद्रशेखर आंबेरकर यांनी चतुर्थ क्रमांक मिळविला. त्यांना गॅस शेगडी, पैठणी आणि चांदीची पैंजण देऊन गौरविण्यात आले. विजेत्यांना मंडळाच्या सल्लागार अॅड. अमृता अरविंद मोंडकर, साक्षी वंजारी, आर्या मुणगेकर, रेश्मा नागवेकर, विद्या फर्नांडिस आणि रुपाली फर्नांडिस यांच्या हस्ते बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
कोळी नृत्य, लावणी अन् जादूच्या प्रयोगांनी वाढविली रंगत
नारळ लढविणे स्पर्धेसोबतच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यातील नामवंत बाल नृत्य कलाकारांनी सादर केलेल्या कोळी नृत्य आणि लावणीने उपस्थितांची दाद मिळविली. बाल जादूगार निखिल ओटवणेकर याच्या जादूच्या प्रयोगांनीही उपस्थितांचे विशेष मनोरंजन केले. पारंपरिक खेळ, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महिलांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे मालवण बंदर जेटीवरील वातावरण चैतन्यमय झाले होते.
सामाजिक संदेश देणाऱ्या कुपनमधून लकी ड्रॉस्पर्धा पाहण्यासाठी आलेल्या महिला-भगिनींनाही या उपक्रमात सहभागी करून घेत सामाजिक संदेश असलेली कुपने देण्यात आली. या कुपनच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये समीक्षा आळवे आणि योगिता गणेश कुबल विजेत्या ठरल्या. दोन्ही विजेत्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या. याशिवाय स्पर्धेत विजेत्या ठरलेल्या तसेच सहभागी झालेल्या सर्व महिलांसाठी आर्या हेल्थ क्लबच्या माध्यमातून तीन दिवसीय ऑनलाइन मोफत ट्रायल आणि आरोग्यविषयक मोफत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या सोहळ्यास मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर, सदस्य देवानंद लुडबे, गणेश पाडगावकर, शुभदा पाडगावकर, रेश्मा खंदारे-नागवेकर, विद्या फर्नांडिस, मंदा जोशी, आर्या मुणगेकर, कोळंब सरपंच सिया चेतन धुरी, रुपाली फर्नांडिस, वायरी उपसरपंच प्राची पराग माणगावकर, स्नेहल मेथर, मंडळाच्या सल्लागार नोटरी अॅड. अमृता मोंडकर, निशा संदीप लाड, अवनीश मेथर आदी उपस्थित होते.
तसेच आमदार निलेश राणे, माजी आमदार वैभव नाईक, दत्ता सामंत, ममता वराडकर, अशोक सावंत, सुदेश आचरेकर, दिपलक्ष्मी पडते, साक्षी वंजारी, मेघनाद धुरी, दीपक पाटकर, राजन वराडकर, बाळू अंधारी, बाबी जोगी, मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, संदेश कोयंडे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविली.
मालवणी संस्कृतीचा ठेवा जपत महिलांच्या सहभागाला आणि कलागुणांना प्रोत्साहन देणारा हा नारळी पौर्णिमा उत्सव यंदाही अविस्मरणीय ठरला.






Subscribe to my channel






