
सनातन संस्थेच्या गुरुपौर्णिमा महोत्सवात ‘रामराज्य’ स्थापनेचा जागर ; देशभरात ८१ ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ ठिकाणी ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न
मालवण : ‘‘संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसर्या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अशा अत्यंत भीषण आणि अस्थिर परिस्थितीतून समाजाला तारण्यासाठी आता केवळ भौतिक उपाययोजना पुरेशा नाहीत. आज दिशाहीन झालेल्या समाजाला पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या आदर्शांवर आधारित ‘रामराज्याची’ नितांत आवश्यकता आहे. मात्र, हे रामराज्य केवळ राजकीय किंवा भौतिक प्रयत्नांतून साकार होणार नाही, तर त्यासाठी समाजाला ‘साधनेचे’ आणि ‘गुरुचरणांचे’ भक्कम आध्यात्मिक अधिष्ठान असणे अनिवार्य आहे. जेव्हा समाजाची आध्यात्मिक श्रद्धा प्रत्यक्ष सुशासनात परिवर्तीत होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने रामराज्याची पहाट होते,’’ असे प्रतिपादन सनातन संस्थेचे वामन परब यांनी केले.
सनातन संस्थेच्या वतीने दैवज्ञ भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘गुरुपौर्णिमा महोत्सवात’ ते बोलत होते . यंदा संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड, इंग्रजी, तेलुगु, मल्याळम् आदी विविध भाषांमध्ये देशभरात ८१ ठिकाणी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली, मालवण, देवगड, कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ले येथे हा महोत्सव संपन्न झाला. आगामी जागतिक युद्धाचे आणि आपत्काळाचे सावट पहाता, हिंदूंनी प्रथमोपचार, अग्नीशमन आणि स्वसंरक्षण प्रशिक्षण घेण्याचे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले.

सध्याच्या परिस्थितीत केवळ पोलीस यंत्रणेवर संरक्षणासाठी अवलंबून न रहाता प्रत्येक हिंदुने स्वतःचे आणि स्वत:च्या कुटुंबाचे रक्षण करण्याइतपत सक्षम होणे आवश्यक आहे. देशातील पोलीस दलाची मर्यादित संख्या आणि उपलब्ध मनुष्यबळ पहाता प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षेचे संपूर्ण दायित्व पोलीस यंत्रणा एकटी पार पाडू शकत नाही. त्यामुळे समाजाने स्वसंरक्षणासाठी सज्ज रहाण्याची आवश्यकता आहे. साधनामय जीवनात अहंनिर्मुलनही महत्वाचे आहे. अहं निर्मुलन म्हणजे मीपणाचे निर्मूलन करणे. गुरूंकडे आपण सत्व अर्पण केले पाहिजे श्री गुरु व भगवंत यांच्याकडे जे सत्व अर्पण करतात तेच जीवनात यशस्वी होतात.

या महोत्सवात प्रारंभी श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य यावर लघुपट, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा संदेश वाचन, धर्मरक्षक आणि हिंदुनिष्ठ यांचे सत्कार, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, रामराज्याच्या स्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप भावपूर्णरित्या करण्यात आला.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, मल्याळम् या भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवा’चा लाभ देश-विदेशांतील हजारो भाविकांनी घेतला.

या कार्यक्रमात पंकज बाळा नेरकर, कोळंब यांनी गुरुपूजन केले तर सतीश गजानन वझे, मालवण यांनी पौराहित्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी तन्वी परब यांनी केले. मुख्य वक्ते वामन परब यांचे अधिवक्ता हेमेंद्र गोवेकर मालवण यांनी स्वागत केले. तर भाजपचे नगरसेवक मंदार केणी व शिवसेना उबाठाचे नगरसेवक तपस्वी मयेकर यांचे स्वागत दीनानाथ गावडे यांनी केले. तर भाजपच्या नगरसेविका सौ.महानंदा खानोलकर यांचे स्वागत सौ. अमृता फाटक यांनी केले. मालवणचे उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, नगरसेवक सुदेश आचरेकर आणि माजी नगरसेविका सौ.पूजा करलकर यांनी कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी अधिवक्ता श्री. गिरीश गिरकर,श्री. हेमेंद्र गोवेकर,श्री. समीर गवाणकर,श्री.ऐश्वर्य मांजरेकर तसेच डॉ.अविनाश झांटये, सौ शिल्पा झांटये उपस्थित होते.





Subscribe to my channel






