हा खासदार लाभला, हे दुर्भाग्य : प्रमोद जठारांची खा. विनायक राऊतांवर जहरी टीका

रिफायनरी प्रकल्प मुख्यमंत्र्यांना हवा, फक्त खा. विनायक राऊत यांनाच नको

वैभववाडी : विकासाची भाषा समजत नसणारा खासदार जिल्ह्याला लाभला, हे कोकणचे दुर्भाग्य असल्याची टीका भाजपचे नेते, माजी आमदार प्रमोद जठार यांनी केली आहे. रिफायनरी प्रकल्प राज्यातील सर्वपक्षीय नेतेमंडळींना हवा आहे. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांना देखील हवा आहे. पण कोकणच्या विकासाच्या मुळावर उठलेला झारीतील शुक्राचार्य खासदार विनायक राऊत यांनाच फक्त हा प्रकल्प नको असल्याचे ते म्हणाले.

चिपी विमानतळ प्रकल्पाचे संपूर्ण श्रेय नारायणराव राणे यांचेच आहे. त्यांनी त्यावेळी पुढाकार घेऊन जमीन भू संपादित केली नसती तर उद्घाटन कार्यक्रम झाला असता का ? विनायक राऊतांना मिरवता आले असते का ? त्यांना सूत्रसंचालन करता आले असते का ? असा सवालही जठार यांनी केला. कोकिसरे रेल्वे फाटक भुयारी मार्ग जमीन मोजणीच्या शुभारंभ प्रसंगी पत्रकारांशी प्रमोद जठार बोलत होते. ते पुढे म्हणाले, कोकणातील अनेक इतर प्रकल्पांचे मूळ हे रिफायनरी आहे. रिफायनरी थांबल्यामुळे वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे मार्ग काम रखडले आहे. विजयदुर्ग – वैभववाडी रेल्वेमार्गाचे काम थांबले आहे. १०० एमएसएमई प्रकल्प थांबले आहेत. कोकणला अधोगतीकडे नेण्याचे काम खासदार राऊत हेच करत आहेत.

कोकण विकासाचा बॅकलॉग भरून काढणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कार्यालयात लवकरच एक महत्वपूर्ण बैठक होणार आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुकाध्यक्ष यांच्या कडून आलेल्या समस्या या बैठकीत मांडल्या जातील. रिफायनरी बाबत पेट्रोलियम मंत्री यांची आपण भेट घेणार आहोत. कोकणात २० रेल्वे स्टेशनवर प्लॅटफॉर्म नाहीत. याबाबत रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेणार आहोत. कोकणच्या विकासाचा बॅकलॉग भरून काढणार असे जठार यांनी सांगितले.
Kunal Manjrekar
Kunal Manjrekar
Articles: 3838

Leave a Reply

error: Content is protected !!