
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरोज परब यांचे आकस्मिक निधन : आज दुपारी २ वाजता मसूरेत अंत्यसंस्कार
शिक्षिका ते जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास थांबला
मालवण : सिंधुदुर्गच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. सरोज शिवाजी परब (वय ६६) यांचे शनिवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने मसुरेसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यावर शोककळा पसरली असून, एक स्नेहशील, संवेदनशील आणि सृजनशील व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
सरोज परब यांचा जीवनप्रवास हा संघर्ष, कर्तृत्व आणि सामाजिक बांधिलकीचा होता. टोपीवाला हायस्कूलमध्ये शिक्षिका म्हणून त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देतानाच समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची धडपड कायम राहिली. शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात प्रवेश केला आणि आपल्या कार्यकर्तृत्वाने या क्षेत्रातही ठसा उमटविला.
मसुरे जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुरू झालेला त्यांचा राजकीय प्रवास जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंत पोहोचला. एका सामान्य कार्यकर्त्यापासून जिल्ह्याच्या सर्वोच्च स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अध्यक्षपदापर्यंतची त्यांची वाटचाल अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली.
राजकारणात केवळ पदासाठी नव्हे, तर विचार, नाती आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणून सरोज परब यांची ओळख होती. आपल्या स्पष्टवक्तेपणासोबतच सृजनशील विचारसरणी आणि माणसे जोडण्याच्या स्वभावामुळे त्यांनी राजकीय क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले.
सरोज परब या राणे कुटुंबाच्या कट्टर समर्थक आणि विश्वासू सहकारी म्हणून परिचित होत्या. राणे कुटुंबाशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राजकीय परिस्थिती कितीही बदलली तरी आपली निष्ठा आणि आपली माणसे त्यांनी कधीही सोडली नाहीत. त्यांच्या राजकीय प्रवासात राणे कुटुंबाशी असलेले हे नाते कायम विशेष राहिले.
सरोजताईंचा अचानक झालेला निरोप मनाला चटका लावणारा ठरला आहे. त्यांच्या जाण्याने केवळ एका कुटुंबाने आपली माय गमावली नाही, तर सिंधुदुर्गच्या राजकीय आणि सामाजिक क्षेत्राने आपले एक आपुलकीचे, सृजनशील आणि कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व गमावले आहे. त्यांच्या अकाली निधनाने निर्माण झालेली पोकळी सहज भरून निघणारी नाही.
सरोज परब या मालवण नगरपालिकेच्या शिवसेना नगरसेविका तथा आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्या मातोश्री होत. आईच्या निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सौ. सरोज शिवाजी परब यांची अंत्ययात्रा रविवार, दि. ३० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता मसुरे येथील त्यांच्या राहत्या घरातून निघणार आहे.






Subscribe to my channel






