
रत्नागिरी : नागरिकांच्या समस्या केवळ ऐकून न घेता त्या शासन दरबारी मांडून प्रत्यक्षात मार्गी लावण्यासाठी भाजपकडून रत्नागिरी (दक्षिण) जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या ‘सेवा अभियानाला’ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या अभियानांतर्गत रत्नागिरी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या विविध समस्या, मागण्या आणि प्रलंबित प्रश्नांची निवेदने स्वीकारण्यात आली.

यावेळी भाजपा कोकण विभागाचे संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता आमदार प्रमोद जठार आणि संतोष साखरे यांनी नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विविध विकासकामे, शासकीय कार्यालयांशी संबंधित प्रश्न, प्रलंबित कामे तसेच स्थानिक पातळीवरील नागरिकांच्या मागण्यांबाबत अनेक निवेदने यावेळी सादर करण्यात आली.

नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची आमदार प्रमोद जठार यांनी गांभीर्याने दखल घेत संबंधित विभागांशी समन्वय साधून प्रश्न सोडविण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. नागरिकांचा प्रश्न हा केवळ निवेदनापुरता मर्यादित न राहता त्याचा पाठपुरावा करून तो मार्गी लावणे, हीच ‘सेवा अभियानाची’ खरी भूमिका आहे, असा विश्वास यावेळी नागरिकांना देण्यात आला.
या अभियानाच्या माध्यमातून भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते थेट जनतेच्या दारात पोहोचत असून, नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासोबतच त्या सोडविण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधण्यावर भर दिला जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना आपल्या प्रश्नांसाठी थेट संपर्काचे आणि पाठपुराव्याचे प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले आहे.
‘सेवा हीच संघटनेची ओळख आणि नागरिकांच्या प्रश्नांचे निराकरण हेच ध्येय’ या भावनेतून सुरू असलेल्या या उपक्रमातून जनतेशी थेट संवाद अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकासकामांना गती देण्यासाठी सातत्याने उपलब्ध राहण्याचा निर्धार यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, स्वानंद रानडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेश भाटलेकर, मंडळ अध्यक्ष दादा ढेकणे, डॉ. ऋषीकेश केळकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.






Subscribe to my channel






